वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष युद्धपातळीवर तयारीस लागल्याचे चित्र असून सभा, बैठका, निरीक्षक भेटी नियमित घडू लागत आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याचा आनंद काँग्रेस गोटात असल्याने या पक्षात इच्छुक जोमात आहे. मात्र त्यांना जागेवर आणण्याचे काम पक्षातील एका अनुभवी महिला नेत्याने करीत कान टोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुसया सभागृहात पक्षाचे निरीक्षक येणार म्हणून तोबा गर्दी उसळली. नारेबाजी समर्थक मंडळींनी सुरू केली. ते पाहून हे थांबवा, बस झाले आगे बढो. असे निरीक्षक कुणाल पाटील यांनी सुनावले. तरीही नारेबाजी थांबत नसल्याचे पाहून पाटील यांनी आता आवाज केल्यास त्या इच्छुकास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. नंतर जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, निरीक्षक पाटील व हिना कावरे, आमदार रणजित कांबळे यांची भाषणे झाली.

हेही वाचा – तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे

हेही वाचा – नागपूर:कर्मचारी संपामुळे वीज संकटावर महत्वाची अपडेट.. कृती समिती म्हणते…

हिना कावरे यांनी दिला ईशारा

निरीक्षक हिना कावरे या मध्यप्रदेशाच्या काँग्रेसच्या माजी आमदार असून एकदा त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपद पण भूषविले आहे. यावेळी त्या पडल्या. कारण काय तर लाडकी बहीण योजना. मध्यप्रदेशच्या धर्तीवार महाराष्ट्रात ही योजना सुरू झाली अन आता त्याचीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत कावरे यांनी सावध केले. त्या म्हणाल्या काँग्रेस नेत्यांनो गाफिल राहू नका. लाडली बहीण योजना गंमतीत घेऊ नका. याच योजनेने मध्यप्रदेशात काँग्रेसचा खेळ खराब केला. काँग्रेस कुटुंबातील महिलांनी पण भाजपला मतदान केले. सतत निवडून येत असल्याने मी विजय गृहीत धरून इतर मतदारसंघात प्रचारास गेली. पण योजनेने माझा घात झाला. योजनेच्या लाभार्थी भगिनींनी काँग्रेसला मत दिलेच नाही. गॅस महागला वगैरे ओरड ठीक. पण गॅस आणायला पुरुष जातात. महिला नाही. त्यांना थेट झळ पोहोचत नाही. महिला योजनेत मिळालेला पैसा खर्च करीत नाही. तो पैसा त्यांना स्वतःचा वाटतो. जपून ठेवतात व चार पैसे आपले असल्याचा तिला आत्मविश्वास वाटतो. पक्षनेते कमलनाथ यांनीही सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेत पैसे वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. पण महिला मतदारांनी मिळालेल्या पैश्यावर विश्वास ठेवून भाजपला सत्तेवर आणले, असा खुलासा हिना कावरे यांनी निवडक नेत्यांपुढे केला. म्हणून योजनेचा परिणाम रोखायचा असेल तर गावागावात जा. भाजपचा वाईट कारभार लोकांपुढे मांडा. काँग्रेसची गरज का, हे पटवून द्या. बूथ पातळीवर नेटाने काम करा. असेही त्या म्हणाल्याचे समजले. इच्छुक उमेदवार चारूलता टोकस, शेखर शेंडे, अशोक मोहोड, डॉ. उदय मेघे, डॉ. सचिन पावडे, सुधीर पांगुळ व अन्य उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha warning of congress leaders on ladki bahin yojana someone gave this warning pmd 64 ssb