वर्धा : भाजप म्हणजे २४ तास पक्षीय कार्यक्रम राबविणारी संघटना, असे म्हटल्या जाते. विविध कार्यक्रम देत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षकार्यास जोडल्या जाते. पदाधिकारी झाले की कुटुंब विसरावे लागते, असे नेते गंमतीने म्हणतात.
आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मंडळ बैठका झाल्यात. त्यात केंद्र व राज्य अर्थसंकल्पातील योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची सूचना झाली. पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले. पक्षात दरारा असणारे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे कान व डोळे म्हणून महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची ओळख दिल्या जाते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनीच उपक्रम दिल्याने तो गांभीर्याने घेतल्या जात आहे. १० जुलैपर्यंत अंमलात आणायचा आहे. मात्र आमदार दादाराव केचे यांनी तो मनावर घेतल्या नसल्याचे बोलल्या गेले. तेव्हा त्यांनी मुदत वाढवून मागितली.
हेही वाचा – मुंबई तुंबली अन् आमदार नागपूर विमानतळावर अडकले
वरिष्ठांच्या परवानगीने आता केचे हे १४ जुलै रोजी मंडळ बैठक घेणार. जिल्ह्यात भाजपचे १८ मंडळ आहे. त्यांच्या बैठकीत सर्व ती चर्चा तसेच आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन धोरण ठरले. ओबीसी घटक हा भाजपचा आधार मानल्या जातो. तो लोकसभा निवडणुकीत कां दुरावला याचा भाजप कार्यकर्ते शोध घेणार आहे. म्हणजे एका बूथवर विशिष्ट ओबीसी समाजाच्या असलेल्या मतांपैकी बहुसंख्य मते का दूर गेली, याचा आढावा घेऊन ती परत पक्षाकडे वळावी म्हणून प्रयत्न होणार. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हे कार्य होणार. कार्यकर्त्यांना त्यासाठी कामाला लागण्याची सूचना देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले. तसेच मतदार यादीतून सुटलेली नावे परत जोडणे, दोन किंवा तीन गावे मिळून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे असा बूथनिहाय आढावा असे कार्यक्रम ठरल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा – बुलढाणा : जिल्ह्यात कोसळधार! १६ मंडळात अतिवृष्टी; पुरात कार वाहून गेली…
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव ज्येष्ठ नेत्यांनी चांगलाच मनावर घेतल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. संघटना बांधणीत कुठे कमी पडलो, बूथबाबत शेवटच्या क्षणी कार्यकर्ते गाफील झाले का, बूथ संचालन करण्यासाठी दिलेले पैसे योग्य हातात पडले की नाही, योजणांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी घटक वर्गाची मते मिळाली की नाही, असा तपशीलवार आढावा घेण्यात सगळे लागले असल्याचे भाजपअंतर्गत चित्र आहे. पराभवाबाबत आरोप प्रत्यारोप करणे सोडा. आता पुढील कामास लागा, अशी सूचना पक्ष निरीक्षक आमदार प्रवीण दटके पूर्वीच देऊन गेले आहे.