वर्धा : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सर्व पक्ष जोमात कामास लागले आहेत. काँग्रेस नेतेही लोकसभा निवडणुकीतील यशाच्या अनुषंगाने उत्साही होत कामाला लागल्याचे चित्र दिसून आले. विधानसभा निवडणुकीबाबत आढावा घेण्यासाठी पक्षाने आमदार अभिजित वंजारी यांना पूर्व विदर्भाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. ते काँग्रेस सदभावना भवनात हजर झाले होते. तेव्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला. तुम्ही आमच्या भावना समजून घेण्यास आले. लोकसभा निवडणुकीवेळी का आले नव्हते. तेव्हा परस्पर सक्षम उमेदवार नसल्याचे ठरवित वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादीस देऊन टाकला. आमचे मत विचारात घेतले नव्हते, अशी भावना व्यक्त झाली.
वर्धा काँग्रेसकडे पण सक्षम उमेदवार असल्याची माहिती यादीसकट मेल केली होती, असे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी नमूद केले. शेखर शेंडे यांनी चारही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावे, अशी रोखठोक भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री नितीन राऊत निरीक्षक होते. पण एकदाही आले नाही. साधे ढुंकून पाहिले नाही. त्यावेळी अमर काळे यांनी पण काँग्रेसतर्फे लढण्याची तयारी दाखविली होती. पण पक्षाने दिलासा दिला नाही. राष्ट्रवादीने मदतीचा हाथ दिला म्हणून ते तिकडून लढले. आता खासदार काळे हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष त्यांच्यावर पुढील जबाबदारी टाकणार. आर्वी मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला पाहिजे. हिंगणघाट पण आपल्याकडे घ्या. आता कोणासही उमेदवारी द्या, पण एकजुटीने काम झाले पाहिजे.
हेही वाचा – यवतमाळ : जुगार खेळण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण! ‘या’ जिल्ह्याची अशी ओळख चिंतनीय
हेही वाचा – विद्यार्थी ‘एमबीबीएस’ शिकण्यासाठी रशियाला का जातात? जाणून घ्या फी व प्रवेशप्रक्रिया
आमदार रणजित कांबळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व करावे. चारही जागांसाठी आग्रह धरावा, अशी भूमिका शेंडे यांनी मांडली. माजी सरपंच डॉ. बाळा माउस्कर यांनी नव्या लोकांच्या फंदात पडू नका, तर निष्ठावंत कार्यकर्त्यास उमेदवारी द्या, असे स्पष्ट करीत नवख्यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाडण्याचेच काम आम्ही करू, असा ईशारा देऊन टाकला. माजी प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, किसान मोर्चाचे शैलेश अग्रवाल, डॉ. शिरीष गोडे, हेमलता मेघे, सुरेश ठाकरे व अन्य नेत्यांनी भूमिका मांडली. हेमलता मेघे यांनी नव्यांना संधी द्या अशी सूचना केली तर प्रवीण हिवरे यांनी मोदी लाटेत पराभव ज्यांनी स्वीकारला त्यांना आता लाट नसताना उमेदवारी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. आमदार वंजारी यांनी शांतपणे सर्वांना ऐकून घेतले. ते सभा आटोपून बाहेर पडल्यावर डॉ. सचिन पावडे यांनी स्वतःच्या उमेदवारीचा अर्ज दिला. काल सायंकाळी ही बैठक आटोपली तेव्हा वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्षास वाऱ्यावर सोडू नका, असाच सूर दिसून आला.