वर्धा : निराधार वृद्धांच्या अडचणी सोडवून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा उपक्रम ‘युथ फॉर चेंज’ संस्थेच्या माध्यमातून युवक राबवित आहे. समाजात अनेक वृद्ध नागरिक कोणत्याही आधाराशिवाय जगत असल्याचे दिसून येते. या दुर्लक्षित तेवढेच असुरक्षित असलेल्या वृद्धांची अवस्था दयनीय असून त्यांचे जीवन गंभीर संकटात सापडल्याचे पाहून युथ फॉर चेंज या युवकांच्या संघटनेने मदतीचा हात देणे सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रामुख्याने बेघर असलेल्या वृद्धांना वैद्यकीय मदत मिळवून देत त्यांच्या निवासाची व्यवस्था करून दिल्या जात आहे. तरूणांचे हे कार्य पाहून समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदतीचा हात पण पुढे केला. ॲड.गुरुराज राऊत व पवन मिरासे यांनी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेत अनेकांना आसरा दिला.

हेही वाचा… ‘स्मार्ट मीटर’साठी वीज नियामक आयोगाची मंजुरीच नाही!

वर्धा सामान्य रूग्णालय परिसरात गोंधळलेल्या परिस्थितीत मोहम्मद सय्यदभाई आढळून आले होते. लोखंडी शटरला ग्रीस मारण्याचे काम करीत ते उपजीविका करायचे. मात्र शारिरीक असाह्यता आल्याने त्यांना सेवाग्रामच्या रूग्णालयात संस्थेचे अभिजीत साळवे यांनी दाखल केले. उपचार सुरू असून त्यांची निवासाची व्यवस्था सेवाश्रमात करण्यात आली आहे. बजाज चौकात पायाला मोठी दुखापत झाल्याने शोभा मटकी या वृद्ध महिलेस सरकारी दवाखान्यात नेवून उपचार करण्यात आले.

तीन महिन्यापासून वर्धा बस स्थानकावर अनाथ अवस्थेत राहणाऱ्या प्रल्हाद नारायण गाडगे यांना प्रेम मंदिर वृद्धाश्रमात आवश्यक तो उपचार करून ठेवण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वी इतवारा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या बंडोजी ढोक या वृद्धास गंभीर स्थिती पाहून सामान्य रूग्णालयात दाखल करीत त्यांचा जीव वाचविण्यात यश आले. राष्ट्रसंत चौकातील दम्याच्या विकाराने ग्रस्त असलेल्या परसराम खोब्रागडे यांना सामान्य रूग्णालयात दाखल करीत उपचार सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा…जखमी तडफडताना बघूनही व्यवस्थापक पळाला…..चामुंडी एक्स्प्लोसिव्हच्या घटनेने नागरिकांमध्ये संताप

ब्राम्हणवाडा गावातील वृद्ध डोमाजी खडसे हे अनाकलनीय वेदनांनी त्रस्त होते. त्यांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यात आली. बोरगाव ते वर्धा मार्गावर मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याच्या स्थितीत लक्ष्मणजी मोहरले दिसून आले. त्यांनी आता सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हात तुटलेल्या अवस्थेतील बबनराव लोखंडे, नेत्रविकाराने ग्रस्त लक्ष्मी पांडुरंग मडावी ही ७५ वर्षीय वृद्धा, कानगाव शिवार, मालगुजारीपुरा, इतवारा आदी ठिकाणी असहाय्य वृद्ध मंडळी आढळून आली होती. त्यांना योग्य तो उपचार व आसरा मिळवून देण्याचे काम या तरूणांनी केले आहे. तरूण वकीलीचा व्यवसाय करणारे युवा गुरूराज राऊत व त्यांचे सहकारी अश्या अनाथ वृद्धांची माहिती मिळाल्यावर तत्परतेने धाव घेत अपेक्षित ती मदत करीत आहे.

ॲड.राऊत म्हणतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून ‘गिरते को उठाना धर्म मेरा’ असे सांगून गेले आहे. दैनंदिन जीवनात सेवेच्या कार्यास पण वेळ देणे हा मनुष्यधर्म असून तो पाळण्याचे हे कार्य होय, असे राऊत सांगतात. आजवर केलेल्या मदतीत शिवाजी चौधरी, चंद्रशेखर राठी, नावेद शेख, अभिजीत साळवे व रूचिता फेंडर यांचे योगदान लाभले आहे. सामाजिक मदत लाभत असल्याने हा उपक्रम व्यापक करण्याचा मानस हे युवा ठेवतात.

हेही वाचा…शालेय अभ्यासक्रमाचा आराखडा राज्यघटनेतील तत्त्वांशी विसंगत;  डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप, म्हणाले ‘जातीव्यवस्था हिंदूंनी नव्हेतर ब्रिटिशांनी…’

चांगल्या कामास मदत करणारे हात पुढे येतातच असा अनुभव आल्याने युवकांच्या या संस्थेने अनाथ वृद्धांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा निर्धार ठेवला. संस्थेचे ऋषीकेश देशमुख, पियुष शेंबेकर, प्रसाद कडे, हर्षला गोडे, स्वप्नील राऊत, चेतन परळीकर हे या कार्यात पुढाकार घेत असतात.