अमरावती : राज्यभरात तलाठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परीक्षा सुरु आहे. परंतु अमरावतीमध्ये सोमवारी या परीक्षेच्या दरम्यान परीक्षार्थींची चांगलाच गोंधळ उडाला. सकाळी ९ ते ११ या परीक्षेची वेळ असताना देखील सर्व्हर डाऊनमुळे वेळेत परीक्षा सुरु होऊ शकली नाही. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार बच्चू कडू यांनी संबंधितांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. सरकारने जर कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले, तर सरकारच्या विरोधात उभे राहण्याची आमची तयारी राहील, असा इशारा बच्चू कडूंनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
बच्चू कडू म्हणाले, तलाठी परीक्षेतील गोंधळ आणि इतर विषयांवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. येत्या ३० ऑगस्टला त्यांची वेळ मागितली आहे. तलाठी किंवा इतर पदभरतीच्या परीक्षा या प्रामाणिक आणि पारदर्शकरीत्या व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. जर बेईमानी होत असेल, तर तो कुणीही असेल, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही सरकारकडे दोन मागण्या करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या, आरोग्य विभागाच्या किंवा तलाठी पदभरतीच्या परीक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमार्फत घ्याव्यात, पण सहा महिन्यानंतर सर्व परीक्षा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्याच्यात, अशी आमची मागणी असणार आहे.