नागपूर : राज्यातील तापमानाने एकीकडे चाळीशी पार केली असताना दुसरीकडे राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे तापमानात देखील वाढ होण्याचा संकेत देण्यात आला आहे. विशेषकरुन विदर्भाला वाढत्या तापमानाचा तडाखा अधिक बसणार आहे.
नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजनुसार पुढील दोन दिवस विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. नागपूर शहराच्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून त्यात आणखी दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात चंद्रपूर आणि ब्रम्हपूरी या दोन शहरांमध्ये सर्वाधिक तापमानासाठी चढाओढ सुरू आहे. या शहरातचे तापमान ४२-४३ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला नागपूर वेधशाळेने दिला आहे.
हेही वाचा >>>नागपूर: धवनकरांनी प्राध्यापकांना पैसे मागितल्याची ध्वनिफीत ‘लोकसत्ता’च्या हाती
दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला असून दुसरीकडे गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झाले आहे. सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.