उपराजधानीतील रामनगर चौकातील हनुमान मंदीर परिसरात शनिवारी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आणि त्यानंतर राणा दांपत्याने राज्य सरकार विरोधात विविध आरोप करत हनुमान चालीसा पठण करून प्रार्थना केली. राणाच्या कार्यक्रमादरम्यान तेथे बजरंगदल आणि भाजपचे काही कार्यकर्ते उभे असल्याचे बघत त्याला भाजपची रसद तर नाही ना? अशी चर्चा रंगली होती.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनीही नागपुरातील रामनगर चौकातील हनुमान मंदीरात शनिवारी हनुमान चालीसा पठन करण्याची घोषणा केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे केंद्र सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याचे म्हणत हनुमान चालीसा भोंगे लावून म्हणण्याची घोषणा केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य बघत शनिवारी सकाळपासून तेथे कडक पोलिस बंदोबस्त लावत दोन्ही पक्षाला काही नियम घालून वेगवेगळ्या वेळी कार्यक्रमाची परवानगी दिली. त्यानुसार सकाळी ११ वाजतापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे गोळा झाले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदीरला लागून असलेल्या मैदानात दुपारी १२ वाजतापासून हनुमान चालीसा, सुंदरकांड, भजन म्हणने सुरू केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या हातातील गॅस, पेट्रोल, डिझेल, जिवनावश्यक औषधी दरवाढिविरोधात केंद्र सरकारच्या जाहिर निषेधाचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, बाबा गुजर, अनिल अहिरकर, प्रशांत पवार, राजेश माटे, अशोक काटले आणि अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन दीड वाजता हनुमान मंदीरात आरती करून समाप्त झाले. त्यानंतर दुपारी दोन ते सवादोन वाजता नवनीत राणा व रवी राणा दांपत्यासह त्यांचे कार्यकर्ते तेथे पोहचले. त्यांनी मंदीरात हनुमान चालीसा म्हणून प्रार्थना केली. याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना नवनीत राणा म्हणाली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रासाठी विघ्न आहे. ते विघ्न दूर होण्यासाठी आम्ही हनुमानाच्या चरणी प्रार्थना करत आहोत. त्यापूर्वीच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे आणि प्रशांत पवार यांनी केंद्राचे महागाईवर नियंत्रण नाही. त्यामुळे सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या भडक्यात सामान्य गेला भरडून. केंद्र सरकार हसत आहे अख्या देशाला रडवून असा आरोप केला.