अकोला : बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. वाशीम जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या असून प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.

वाशीम जिल्ह्याच्या कारंजा येथील मौजे खेर्डा (जिरापुरे) येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असताना संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाशीमच्या जिल्हाधिकारी बुबनेश्वरी एस यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत.

वाढता धोका लक्षात घेता बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. स्वच्छता आणि आरोग्य उपाययोजनेंतर्गत पोल्ट्री फार्म स्वच्छ ठेवावा आणि जैवसुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अचानक मृत्यू, श्वास घेण्यास त्रास होणे, मंदावणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधा. संसर्ग टाळण्यासाठी बाधित पक्ष्यांची वाहतूक करण्यास सक्त मनाई केली आहे. स्थलांतरित पक्षी, कावळे किंवा इतर वन्य पक्षी मृत आढळल्यास अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी, असे देखील सांगण्यात आले.

फवारणी आवश्यक

ग्रामपंचायतीने १ लिटर पाण्यात ७ ग्रॅम वॉशिंग सोडा मिसळून पोल्ट्री शेड, गटार, नाल्यांवर फवारणी करावी. हे दर १५ दिवसांनी तीन वेळा करावे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सूचित केले. नागरिकांनी सतर्क राहून पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन गणेश पवार आणि उपायुक्त डॉ. अरुण यादगिरे यांनी केले.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लूला ‘एव्हियन इन्फ्लूएंझा’ देखील म्हणतात. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो केवळ पक्ष्यांनाच नव्हे तर मानवांना आणि इतर प्राण्यांनाही संक्रमित करू शकतो. विषाणूचे बहुतेक प्रकार पक्ष्यांसाठी मर्यादित आहेत. एच५एन१ हा बर्ड फ्लूचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तो पक्ष्यांसाठी घातक आहे आणि वाहकाच्या संपर्कात येणाऱ्या मानवांना आणि इतर प्राण्यांना सहजपणे प्रभावित करू शकतो. आजारी पक्ष्यांच्या जवळच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, जसे की कुक्कुटपालन कामगारांना, बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. जेव्हा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात, नाकात किंवा तोंडात जातो किंवा श्वास घेतला जातो तेव्हा हे होऊ शकते. जरी पक्षी (पक्षी) इन्फ्लूएंझा (फ्लू) ए विषाणू सहसा लोकांना संक्रमित करत नाहीत, परंतु, या विषाणूंमुळे मानवांमध्ये संसर्ग झाल्याची काही दुर्मीळ प्रकरणे आढळली आहेत.

Story img Loader