अकोला : वाशीम जिल्ह्यात गंभीर तीव्र कुपोषण (सॅम) श्रेणीमधील ३९९ पैकी ३८७ बालके ही कुपोषणमुक्त झाली आहेत. अवघ्या पाच महिन्यात ९६ टक्के कुपोषणात घट झाली. कुपोषण निर्मूलनात वाशीम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी कुपोषण मुक्तीची मोहीम सुरू झाली. सॅम, मॅम, एसयूडब्ल्यू आणि एमयूडब्ल्यू या चार प्रकारच्या एकूण कुपोषित बालकांची संख्या १३ हजार ५१५ होती. त्यापैकी ११ हजार ५७४ बालके कुपोषणातून बाहेर आली आहेत. वाशीम, मालेगाव आणि कारंजा या तीन तालुक्यामध्ये गंभीर तीव्र कुपोषण श्रेणीमध्ये (सॅम) एकही कुपोषित बालक राहिला नाही. तसेच मध्यम श्रेणी कुपोषणामध्ये एक हजार २३७ पैकी एक हजार ०७७ बालके उपोषण मुक्त झाली आहेत. याचे प्रमाणही ८७ टक्केच्या वर आहे. सॅम, मॅम, एसयूडब्ल्यू आणि एमयूडब्ल्यू या चारही प्रवर्गातील कुपोषण ७३ टक्के कमी झाले. जिल्ह्यामध्ये २७ टक्के कुपोषित बालके शिल्लक राहिली आहेत. अतितीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांचे प्रमाण तीन तालुक्यात निरंक, तर उर्वरित तीन तालुक्यांमध्ये १६ कुपोषित बालके आहेत.
हेही वाचा : “भिक्खू बनवून देतो, तेही थायलंडला,” इंजिनियरने वृद्धाला दोन लाखाने गंडविले…
महिला व बाल कल्याण विभागात कार्यरत विस्तार अधिकारी मदन नायक यांनी सुरुवातीपासूनच कुपोषण निर्मूलनाच्या कार्यामध्ये झोकून कार्य केले. विस्तार अधिकारी पदाचा प्रभार सांभाळून वाशीम तालुक्याचा अतिरिक्त प्रभार त्यांनी सांभाळत दोन्ही तालुक्यांमध्ये गंभीर तीव्र श्रेणीतील कुपोषण शून्यावर आणले. मालेगाव तालुक्यातील सीडीपीओ सारिका देशमुख यांनी तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी सुरुवातीपासूनच पुढाकार घेतला. परिणामी मालेगाव तालुका या कामात नेहमी आघाडीवर राहिला. कुपोषण निर्मूलनाचे या कामामध्ये नेमण्यात आलेले पालक अधिकारी, सह पालक अधिकारी, पालक कर्मचारी यांचेही भरीव योगदान राहिले. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आणि सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. त्यामुळे वाशीम जिल्हा आता कुपोषण मुक्तीच्या वाटेवर आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातून कुपोषण निर्मूलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : शाळा बुडवून खासगी शिकवणीला जाता, बारावी परीक्षेला मुकाल… नवा नियम जाणून घ्या…
कुपोषण निर्मूलनाच्या मोहिमेत मालेगाव आणि वाशीम तालुक्याने आघाडी घेतली आहे. उर्वरित तालुक्यांनीही असेच काम केल्यास येणाऱ्या १५ ऑगस्टपूर्वी वाशीम जिल्हा संपूर्णपणे कुपोषण मुक्त होईल, असा विश्वास वाटतो.
वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम.