अकोला : पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने चक्क स्वत:सह कुटुंबातील सदस्यांच्या किडनी व इतर अवयव विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.जिल्ह्यातील आडोळी येथील शेतकरी सतीश भागवत ईढोले यांनी वाशीम शहरातील बाजारपेठेत ‘स्वस्त भावात माझ्यासह कुटुंबियांची किडनी व इतर अवयव विकत घ्या’ असा फलक हातात घेऊन आंदोलन केले. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देखील पाठवले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची आशा लागली होती. मात्र, निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीत बदल झाला. नेत्यांचा सूर बदलला आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी बँकांचे पीक कर्ज फेडून टाकावे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य ही शासनाची भूमिका असल्याचे सांगितले. कर्जमाफीची अपेक्षा फोल ठरल्याने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोषाची भावना आहे. त्यातच पीक कर्ज वसुलीसाठी बँकांनी शेतकऱ्यांकडे तगादा सुरू केला आहे. अगोदरच नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. त्यातच उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना पडलेल्या भावात आपला माल विक्री करून मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे दिसून येते.

वाशीम जिल्ह्यातील आडोळी येथील शेतकरी सतीश भागवत ईढोले यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाविरोधात आंदोलन केले. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून संपूर्ण कुटुबांतील सदस्यांची किडनी विकत घ्यावी, असे म्हटले आहे. शासनाकडून कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात मागील वर्षभरात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत आणि बँका वसुलीसाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे पीक कर्ज फेडण्यासाठी माझ्यासह कुटुंबातील सदस्यांच्या किडनी विकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्याच्या या भूमिकेची चांगली चर्चा होत आहे.