वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे दूषित पाणीमुळे जवळपास ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. शनिवारी काहींना उलटी, मळमळचा त्रास उद्भवला. रविवारी अनेकांना अत्यवस्थ वाटत असल्याने वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काही अत्यवस्थ रुग्णांना अकोला येथे हलवण्यात आले आहे, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. त्यानंतर पूर्ववत करण्यात आला. शनिवारी गावातील काही नागरिकांना दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी, मळमळचा त्रास उद्भवला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु रविवारी गावातील अनेकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही अत्यवस्थ रुग्णांना तातडीने अकोला येथे हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य उपचार व काळजी घेतली नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेणे पसंत केले. सध्या रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी दिली. गावातील पाईपलाईन नादुरुस्त आहे. यातून दूषित पाण्याचा पुरवठा झाला. हे दूषित पाणी पिल्यामुळे अनेकांना त्रास उद्भवला. आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी तातडीने गावात जावून पाहणी केली आहे. सर्वांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – “…तर दगडालाही शेंदूर फासून लढण्याची तयार ठेवा,” खासदार अरविंद सावंत यांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “मातोश्रीचे आदेश…”

पाईपलाईनमधील बिघाडामुळे साथरोगाचा विळखा!

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. गावात नळयोजना कार्यान्वित आहे. मात्र, राजकीय अनास्थेपोटी पाईपलाईनच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आणि गावात साथरोगाचा प्रसार झाला, असे अनेकांचे म्हणणे आहे. गावातील विहिरींची नियमित स्वच्छता केली जाते का, विहिरींमध्ये ‘ब्लिचींग पावडर’ नियमित टाकले जात आहे का, याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा – पीक कर्ज वाटपात यंदाही कूर्मगती, अकोला जिल्ह्यात केवळ ५२.५८ टक्के शेतकऱ्यांनाच…

बहुतांश गावात अशुद्ध पाणी पुरवठा

पावसाच्या पाण्यामुळे सध्या ग्रामीण भागातील सर्वच विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नागरिकांकडून याच पाण्याचा वापर होतो. मात्र, बहुतांश गावांतील विहिरींमध्ये ‘ब्लिचींग पावडर’ टाकले जात नाही. नाल्यांची स्वच्छता न झाल्याने सांडपाणी रस्त्यावरूनच वाहते. विहिरींच्या जवळच उकीरडे आहेत. यामुळे साथरोगाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे आणि नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.