महापौरांकडून निलंबनाचे आदेश

जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटल परिसरात अनधिकृत पार्किंग, नंदनवन, हसनबाग, भांडे प्लॉटमध्ये दूषित पाणी, नाल्यावर अनधिकृत बांधकाम, नंदनवन आणि नेहरूनगर भागातील कचराघर, पाण्याची टंचाई अशा विविध समस्या सांगत नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. हसनबाग परिसरात मल वाहिनीच्या चेंबरमधून पाण्याचे कनेक्शन लावण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमातर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी नेहरूनगरमधील प्रभाग २६ व २७ अंतर्गत मिरे लेआउट, भांडे प्लॉट, जगनाडे चौक, नंदनवन, हसनबाग, वाठोडा आदी ठिकाणी भेट देऊन समस्यांचा आढावा घेतला. नेहरूनगर येथील मिरे लेआउट येथील एका भूखंडधारकाने सुरक्षा भिंत बांधली असून तो मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी त्रास सहन करावा लागतो. याशिवाय वस्तीतील मार्गावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली. भांडे प्लॉट येथील जलवाहिनीतून गळती होत असल्यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे तेथील महिलांनी सांगितले. पाणी मिळण्याची निश्चित वेळ नसल्याचेही महापौरांना सांगण्यात आले. या  दूषित पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये येणारी वाहने रस्त्यावर लावली जातात. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होते. नंदनवन येथील हसनबाग परिसरात पोलिस चौकीच्या मागील बाजूस कचऱ्याचे साम्राज्य आहे. लगतच्या मलवाहिनीच्या वरील स्लॅब तुटल्याने परिसरात दरुगधी पसरत असल्याची तक्रार रहिवाशांनी यावेळी केली. हसनबाग पोलीस चौकीपुढील मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने येथे सतत अपघाताचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी या चौकामध्ये वाहतूक सिग्नल लावण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. वाठोडा येथील दहनघाटापुढे अतिक्रमण करण्यात आले आहे. या परिसरातील नाल्यावर भिंत नाही. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

आज प्रभाग २८ व ३० मध्ये दौरा

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत उद्या बुधवारी महापौर नंदा जिचकार नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २८ व ३० चा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Story img Loader