अविष्कार देशमुख
ऐन हिवाळ्यातच विहिरी कोरडय़ा
शहराची भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी खालावण्याचे सरासरी प्रमाण जमिनीपासून एक ते पाच मीटरदरम्यान होते. मात्र, यंदा ते दहा मीटरच्या खाली गेले आहे. शहराच्या काही भागातील विहिरी तर आत्तापासून कोरडय़ा पडल्या आहेत. एकीकडे धरणातील जलसाठा कमी होत असताना भूजलपातळीही वेगाने खाली जात आहे. त्यामुळे यंदा नागपूरकरांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
शासनाचे केंद्रीय जल मंडळ (सेंट्रल ग्राऊन्ड वॉटर बोर्ड) वर्षांतून दोनदा शहरातील भूजल पातळीची तपासणी करते. यामध्ये शहराच्या विविध भागातील विहिरीतील पाण्याची पातळी मीटरमध्ये मोजली जाते. भूजल पातळीची तपासणी उन्हाळ्यात मे महिन्यात आणि पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होते. शहराच्या ९४ भागात असलेल्या १०१ विहिरींची तपासणी दरवर्षी केली जाते. या तपासणीमध्ये वंजारीनगर, के. टी. नगर, विमानतळ प्रभाग, सोमलवाडा, रविनगर, कळमना मार्ग, गणेशपेठ, छिंदवाडा मार्ग, नारा, गणेशनगर, कळमना या परिसरातील भूजल पातळी कमालीची खालावल्याची नोंद आहे. भूजल पातळी वाढण्यासाठी चांगले पर्जन्यमान गरजेचे असते. तसेच वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरणे आवश्यक असते. मात्र, अलीकडे शहरातील अनेक भागात सिमेंटचे रस्ते आणि मेट्रोच्या कामांमुळे काँक्रिटीकरण केल्याने पाणी मुरतच नसून ते थेट वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पाऊस कमी झाल्याने पाण्याचे साठे कमी कमी होत आहेत. पाण्याची उपलब्धता मर्यादित झाली आहे. भूगर्भातील पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळेही पाण्याची पातळी खालावत आहे. शहराच्या मोजक्याच भागात पाण्याची भूजल पातळी सरासरीपर्यंत असून निम्म्या शहराची भूजल पातळी सरासरीपेक्षा खाली आली आहे. भविष्यातील पाणी टंचाई बघता जलसंरक्षणासाठी आता नव्याने व्यापक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. भूगर्भात जे पाणी आहे ते वापरण्यावर कडक र्निबध घालणे आवश्यक आहे. सरकारने सिमेंट बंधारे, समतोल पाणलोट विकास, तलावातील गाळ काढणे, ओढय़ांवर हंगामी बंधारे, जुन्या विहिरींचे खोलीकरण अशा विविध उपाययोजनांद्वारे पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत, पण त्या यशस्वीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत. पाण्याचे जुने स्रोत दुर्लक्षित आहेत. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन केले तरच पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे.
मागील पाच वर्षांतील भूजल पातळी (मि.मी.)
* विमानतळ प्रभाग –
मे २०१३ (१२.९५) नोव्हेंबर २०१३ (८.७०), मे २०१४ (१२.६०) नोव्हेंबर २०१४ (११.९०), मे २०१५ (१२.११) नोव्हेंबर २०१५ (८.९०), मे २०१६ (१०.८०) नोव्हेंबर २०१६ (९.६०), मे २०१७ (११.५) नोव्हेंबर (९.९), मे २०१८ (१०.२).
* सोमलवाडा – मे २०१३ (११.२५) नोव्हेंबर २०१३ (१२.३०), मे २०१४ (१७.००) नोव्हेंबर २०१४ (७.९०), मे २०१५ (११.१७) नोव्हेंबर २०१५ (८.२०), मे २०१६ (१३.८०) नोव्हेंबर २०१६ (९.००),मे २०१७ (१५.४) नोव्हेंबर (७.५), मे २०१८ (१५.१).
* वंजारीनगर – मे २०१३ (८.६०) नोव्हेंबर २०१३ (४.८०),मे २०१४ (८.१०) नोव्हेंबर २०१४ (७.४०), मे २०१५ (८.७०) नोव्हेंबर २०१५ (५.५०), मे २०१६ (१०.१०) नोव्हेंबर २०१६ (५.४०), मे २०१७ (११.७) नोव्हेंबर (६.५), मे २०१८ (९.३).
* रवीनगर – मे २०१३ (४.१०) नोव्हेंबर २०१३ (३.६०), मे २०१४ (७.३५) नोव्हेंबर २०१४ (४.१०), मे २०१५ (६.२०) नोव्हेंबर २०१५ (३.४०), मे २०१६ (८.८०) नोव्हेंबर २०१६ (४.२०), मे २०१७ (७.७) नोव्हेंबर (४.९), मे २०१८ (६.४).