अमरावती : सद्यस्थितीत अमरावती विभागात ७१ गावांमध्ये ७५ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना का होऊ शकल्या नाहीत, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. अमरावती विभागात गेल्या पाच वर्षांमध्ये या कार्यक्रमावर सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तरी पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात ५७ गावांमध्ये ५८ टँकर, अमरावती जिल्ह्यात ८ गावांमध्ये ११ टँकर तर यवतमाळ जिल्ह्यात ६ गावांमध्ये ६ टँकर लागले आहेत. अकोला आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले, तरी येत्या काही दिवसांत टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे.

हेही वाचा…यवतमाळात तोतया पोलिसांसह खऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ; वृद्धास लुटले, नेरमध्ये चार घरफोड्या

सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ११ टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी एक तर खडीमल येथे चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकराद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दूषित पाण्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

दरवर्षी तात्पुरत्या नळ पाणी योजना, कूपनलिका, इतर पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या जातात. पाणीटंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यात ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र’ असा नारा देत जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला होता. अमरावती विभागात गेल्या तीन वर्षांत सुमारे ३ हजार १०६ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असताना, अनेक भागांत पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वणवण विरोधाभास स्पष्ट करणारी ठरली आहे.

हेही वाचा…अकोला : वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे वाढते संकट, तीन महिन्यात ५२ बळी

विहिरी, नद्या, नाले आटले; तलावांनी गाठला तळ

बुलढाणा जिल्ह्यात यंदा डिसेंबर २०२३ अखेरीस दोन टँकर सुरू होते. नंतर, त्यात झपाट्याने वाढ होत गेली. सध्या ५ तालुक्यातील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांची तहान टँकरने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठाद्वारे भागवली जात आहे. याशिवाय ८ तालुक्यातील १३६ गावांना १६८ अधिग्रहीत खासगी विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरांना कुठून पुरवायचे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. अनेक भागांतील विहिरी, नद्या, नाले आटले असून तलावांनीही तळ गाठला आहे. धरणांमधील साठाही झपाट्याने कमी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water crisis deepens in amravati division and western vidarbh villages rely on tanker supply mma 73 psg
Show comments