नागपूर : २३सप्टेबर २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत अंबाझरी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहात गेल्याने परिसरातील वस्त्या पाण्यात बुडाल्या होत्या.त्यानंतर दहा महिन्याने पुन्हा अंबाझरी तलाव भरला आहे.अंबाझरी तलावाची ‘ओव्हरफ्लो’ पातळी ३१७ मीटर इतकी असून २४ तारखेला ३१६.१८ मीटरपर्यंत पाणी पोहचले आहे.  पावसाचा जोर वाढला किंवा तलावाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते. शहरातील गोरेवाडा तलावही तुडूंब भरला आहे. या तलावाची ‘ओव्हरफ्लो’ पातळी ३१७ मीटर असून बुधवारी ३१३. ३८ मीटरपर्यंत पाणी पोहचले आहे.

मागच्या वर्षी अंबाझरी तलावातील पाणी नागनदीतील अडथळ्यामुळे वाहून न गेल्याने तलावालगतच्या वस्त्यांसह शहराच्या इतरही भागात पाणी शिरले होते. शनिवारी २० जुलै रोजी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा त्या पुराची आठवण झाली होती. अंबाझरी तलाव ओव्हर  फ्लो होऊ नये म्हणून दररोज दीड लाख लिटर पाणी सोडले जात आहे. त्यानंतरही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सध्या सांडव्याजवळच पुलाचे बांधकाम सुरू आहे.तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पाणी वाहून जाण्याच्या मार्गात बांधकाम अडथळा ठरू शकते. त्यामुळे अंबाझरी लेआऊटसह इतर भागातील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>>बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…

सरकारच्या उपाययोजना काय ?

महापालिकने क्रेझीकेसलमधून वाहणाऱ्या नागनदी पात्रातील अडथळे दूर केले आहे. मात्र पाणी प्रवाहात प्रमुख अडथळा असलेले स्मारक हटवण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. २३ सप्टेबर २०२३ चा पूर ओसरल्यानंतर पुन्हा ही पूरस्थिती उद्भवू नये म्हणून तातडीने उपाययोजना केल्या जातील,  असे  आश्वासन महापालिकेने दिले होते. परंतु तब्बल ९ महिन्यानंतर पुल रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहे. नदीपात्र रुंद करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. तलावातील पाण्याचा उपसा क रण्याऐवजी प्रशासनाने पूरप्रतिबंधक उपाययोजनांवर अधिक भर  देण्याची गरज पूरबाधित अंबाझरी लेआऊटमधील नागरिक गजानन देशपांडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>पुन्हा विधानसभा गाठण्यासाठी सुनील केदारांचा ‘सर्वोच्च’ प्रयत्न, उद्या न्यायालयात जो निर्णय…

पुराच्या सावटाखाली वस्त्या

मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे झालेली हानी कोट्यावधी रुपयात आहे. शासनाने जुजबी मदत केली आहे. त्यामुळे नागरिक नाराज आहेत. लाखोंचे नुकसान झाल्यावर फक्त दहा हजाराची मदत जाहीर केल्याने अनेकांनी ही मदत नाकारली होती.आता तलाव पुन्हा भरल्याने या वस्त्यांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना दृश्यस्वरुपात दिसून येत नसल्याने नागरिक नाराज आहेत.

उच्चस्तरीय समितीचे लक्ष

अंबाझरी तलाव बळकटीकरणाच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नियुक्त केली आहे. या समितीची कामावर देखरेखअसूनही अनेक कामे अपूर्ण आहे.