यवतमाळ : उन्हाळा सुरू होत असल्याने नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव निर्माण होत आहे की, काय असे मथळा वाचून वाटू शकते. या महामार्गावर यवतमाळ शहराबाहेर वनवासी मारोती चौकात सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामाने पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जागोजागी फुटल्याने जलतरण तलाव निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना लिकेजमधून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यवतमाळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर आर्णी रोडवर वनवासी मारोती चौकात उड्डाणपुलाचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. त्यासाठी जुन्या मार्गालगत जीवन प्राधिकरणची मोठी पाईपलाईन टाकलेली आहे.
जीवन प्राधिकरणने अलिकडेच या भागात दररोज नळ सोडण्यास सुरूवात केली. मात्र महामार्गाच्या कामामुळे २५० व्यासाची डीआयके उर्ध्वनलिका जागोजागी फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर रस्ते प्राधिकरणने हे काम सोपविलेल्या कंत्राटदाराने ती दुरूस्त करून द्यावी, असा नियम आहे. मात्र, पाईप फुटल्यानंतर जीवन प्राधिकरण कळविण्याचे किंवा पाईपलाईन दुरूस्त करून देण्याचे सौजन्यही हा कंत्राटदार घेत नाही. त्यामुळे या भागात दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जिथे पाईप फुटला तेथून जागा मिळेल तेथे पाणी शिरत असल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या पाईपलाईनवरून वनवासी मारोती ते वाघाडी गावठाण, लक्ष्मण विहार, इंद्रायणी नगर, पट्टे ले आऊट, पृथ्वीराज नगर, समर्थ लॉन आदी भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या चार महिन्यांपासून पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.हे काम उमा कंस्ट्रक्शनच्या वतीने केले जात आहे. मात्र पाईपलाईन फुटल्यानंतर ही कंपनी जीवन प्राधिकारणला कळवतही नाही, अशी तक्रार जीवन प्राधिकरणने तीन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही या प्रकरणी कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खर्च कंस्ट्रक्शन कंपनीने करावा
आर्णी मार्गावर उड्डाणपुलाच्या कामामध्ये पाईपलाईन जागोजागी क्षतीग्रस्त झाली आहे. मात्र कंत्राटदाराकडून या बाबत आमच्या कार्यालयास कोणतीही सूचना दिली नाही. सदर कामामुळे क्षतीग्रस्त झालेली २५० मीमी व्यासाची डीआयके ९.८०० पाईपलाईन काढून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. हा खर्च युटिलिटी अंतर्गत उमा कंस्ट्रक्शनकडून करावा लागणार आहे. तसे जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांनाही कळविण्यात आले आहे, असे जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी सांगितले.