अकोला : काटेपूर्णा सिंचन प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे नऊ महिन्याच्या कालावधीतच नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. जलसंपदा विभागाच्या इतिहासात विक्रमी कालावधीत प्रकल्पग्रस्तांचे सुसज्ज गावठाणात पुनर्वसन करणारा हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.काटेपूर्णा सिंचन प्रकल्प मूर्तिजापुर तालुक्यातील मध्यम स्वरूपाचा असून मंगरुळ कांबे गावाजवळ नदीवर उभारण्यात येत आहे. ३१ ऑगस्ट २००७ रोजी रु.६९.९७ कोटीची प्रशासकीय मान्यता प्रदान केली. १२ गावांमधील एकूण ३०६.०१ हेक्टर जमीन प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रांतर्गत संपादित करण्यात आलेली आहे. या जमिनीमध्ये खासगी जमीन २२१.५८ हे.आर. शासकीय जमीन ७८.०९ हे. आर, वन जमीन ६.३४ हे.आर यांचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत जांभा बु. हे गावठाण अंशतः बाधित होत आहे. गावठाणातील एकुण ६३ कुटुंबे व ८ सार्वजनिक मालमत्ता अशा ७१ मालमत्ता बाधित होत असल्याने त्यांचे पुनर्वसन मौजे जांभा बु. येथील गावठाण जमिनीवर करण्यात आले. मूळ गावापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर हे पुनर्वसन झाले.

भूसंपादन प्रकरणात २६ मार्च २०२१ रोजी अंतिम निवाडा पारीत झाला. प्रकल्पग्रस्तांना २५ मे २०२१ रोजी भूखंड वाटप व भूसंपादन मोबदला अदा करण्यात आला. भूखंड व मोबदला वाटप झाल्याने पुनर्वसित गावठाणात घराचे बांधकाम करण्यास चालना मिळाली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण अधिक वेगाने होण्यास मदत झाली. जांभा बु. पुनर्वसित गावठाणात आवश्यक सर्व नागरी सुविधा व इतर सेवांचे बांधकाम उत्कृष्ट गुणवत्तेसह नऊ महिन्यात विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आले. ते अकोला जिल्हा परिषदेला हस्तांतरित केले. या कालावधीतच प्रकल्पग्रस्तांनी नवीन पुनर्वसित गावठाणात त्यांच्या सदनांचे बांधकाम पूर्ण केले. नागरी सुविधा हस्तांतरणावेळी सुमारे ८० टक्के प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण पूर्ण झालेले होते. सध्या १०० टक्के पुनर्वसन झाले. विक्रमी वेळात सर्व नागरिक सुविधांसह प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणारा काटेपूर्णा हा जलसंपदा विभागाच्या इतिहासातील पहिलाच प्रकल्प ठरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

३.२९ कोटींची आर्थिक बचत

पुनर्वसनासाठी जांभा बु. शिवारातील ४.४९ हे. आर गावठाणाची अकृषक जमीन संपादित केली आहे. भूसंपादन प्रकरणात जलसंपदा विभागाने न्यायालयाच्या निर्णयानुसार सूक्ष्म अभ्यास करून पाठपुरावा केला. यामध्ये शासनाची ३.२९ कोटी रुपयांची आर्थिक बचत देखील झाली आहे, अशी माहिती पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांनी दिली.