बुलढाणा : अपुऱ्या पावसामुळे पावसाळा संपत आला असतानाही पाणी टंचाईचा जिल्ह्यातील ‘मुक्काम’ कायम आहे. यावर कळस म्हणजे ही टंचाई केवळ पाण्याचीच नसून निधीचीही असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना उधारीवरच सुरू आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाई सप्टेंबरमध्येही कायम आहे. तब्बल ६७ गावांतील लाखावर ग्रामस्थांची तहान कृत्रिम उपाययोजनांद्वारे भागविली जात आहे. मार्च २०२३ अखेरीस सुरू झालेले ४ गावांतील टँकर अजूनही कायम आहे. बुलढाणा तालुक्यातील हनवतखेड, सावळा, वरवंड आणि पिंपरखेड या गावांना सव्वापाच महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय तब्बल ६३ गावांतील हजारो राहिवाशीयांची तहान ७३ अधिग्रहित खाजगी विहिरींद्वारे भागविली जात आहे.
दरम्यान, पाणी टंचाई कृती आराखड्यातून आजवर विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या. यापैकी आज ११ सप्टेंबर अखेर नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर ६० लाख रुपये खर्ची झाले आहे. टँकरवर सर्वाधिक म्हणजे २ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहे. याशिवाय अधिग्रहित विहिरींचा खर्च १ कोटी ५६ लाख इतका झाला आहे. जवळपास साडेचार कोटींचा खर्च झाला असला तरी गतिमान शासनाकडून कवडीचाही निधी मिळाला नाही. यामुळे उपाययोजना उधारीवरच सुरू आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.