वाशीम : सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यातच ‘जल जीवन मिशनअंतर्गत हर घर नल’ योजनेची महती गायली जात आहे. मात्र, मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी या आदिवासी बहुल पाड्यावर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक सत्य आहे.
मालेगाव तालुक्यातील अकोला वाशीम सीमारेषेवर मेडशी गावापासून केवळ तीन किलो मीटर अंतरावरील मोर्णा नदीच्या काठावर असलेल्या वाकळवाडी या आदिवासी बहुल पाड्यावर पाण्याची भीषण समस्या आहे. गावात पाण्याची टंचाई असल्याने नदीपात्रात फूट दोन फूट खोदून पाणी झिरपल्यानंतर पाणी काढून भरावे लागत आहे. यासह जिल्ह्यांच्या सीमा रेषेवरील अनेक गावांची स्थिती भीषण आहे.
हेही वाचा – नागपूर: सुट्यांमध्ये फिरून आलेल्यांना सर्दी, खोकला, ताप; अशी घ्या काळजी
पाणी आहे, नियोजन नाही!
जिल्हा परिषदअंतर्गत जल जीवन मिशन योजना राबविली जात आहे. ज्या गावात पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. तिथे पाण्याची वणवण आहे. परंतु जेथे जुनी पाणीपुरवठा योजना आहे. किंवा बंद अवस्थेत आहे. तिथे मात्र, नव्याने जल जीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे पाणी नसलेल्या गावात कोण नियोजन करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकांक्षित जिल्ह्याच्या नावाखाली केवळ कमिशन लाटल्या जाते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी तळागाळात जाऊन पाहणी करावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शुद्ध पाणी न मिळणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. – सचिन कुलकर्णी, जलतज्ञ, वाशीम.