बुलढाणा: यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तब्बल ७५९ गावांत पाणीटंचाई उद्भभवणार असल्याचा शासकीय यंत्रणांचा अंदाज आहे. यामुळे लाखो ग्रामीण नागरिकांना नजीकच्या काळात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार अशी दाट शक्यता आहे.
हेही वाचा >>> कसब्यातील पराभवावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
तेरा तालुक्यांचा समावेश असलेल्या जिल्ह्यातील गावांची संख्या १४१० इतकी आहे. या तुलनेत अर्ध्याधिक म्हणजे ७५९ गावांत टंचाई उद्भभवणार असून मार्च अखेर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे आहे. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात टंचाई जाणवली नाही. मात्र आता टंचाईने डोके वर काढले आहे. मार्च अखेर ४०५ गावांत टंचाई जाणवेल असा यंत्रणांचा अंदाज आहे. यामुळे ३८१ खासगी विहिरी अधिग्रहण व ३३ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.
दुसरीकडे एप्रिल ते जून दरम्यान ३५४ गावांत टंचाई उद्भभवण्याची शक्यता आहे.
अकरा कोटींचा आराखडा दरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा व महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आणि भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भू वैज्ञानिक यांनी टंचाई कृती आराखड्यास मान्यता दिली आहे. यामध्ये ९४७ योजनाचा समावेश असून त्यावर ११ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये खाजगी विहीर अधिग्रहण व टँकर वर भर देण्यात आला आहे. ६७२ गावांसाठी ७१४ विहीर अधिग्रहण व ४४ गावात टँकरने पाणी पुरवठ्याचे नियोजन आहे. याशिवाय नळ योजना दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, तात्पुरती नळ योजना आदी योजना राबविण्यात येणार आहे.