लोकसत्ता टीम

बुलढाणा: जिल्ह्यात मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली असून तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची पाण्याअभावी होरपळ सुरू आहे.

लोकसभेच्या धामधुमीत पाणी टंचाईने जिल्हावासी व जिल्हा प्रशासन यांची कठोर परीक्षा घेतली. मे अखेरीस पाणी टंचाईची दाहकता वाढली. २९० गावांत पाणी नाही. ६७ गावांतील तब्बल २ लाख १८ हजार २५२ ग्रामस्थांना तहान व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केवळ टँकरचाच आधार आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १५ , चिखली व देऊळगाव राजा मधील प्रत्येकी १४, मेहकर मधील १३, मोताळा मधील ६ सिंदखेडराजा मधील ३ तर लोणार तालुक्यातील २ गावांचा समावेश आहे. या गावांना ७१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

आणखी वाचा-नाना पटोले म्हणतात, “४ जूननतंर शिंदे आणि अजित पवार गट राहील की नाही…”

दुसरीकडे २२३ गावातील गावकऱ्यांची तहान २५९ अधिग्रहित खाजगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. मेहकर तालुक्यातील ५० गावांसाठी ५७ , देऊळगाव राजा मधील २८ गावांना ५२, शेगावमधील ७ गावांना ७, मोताळातील १८ गावांना १८, चिखलीतील ४६ गावांना ५३, बुलढाणातील २३ गावांना २५ सिंदखेडराजा मधील ३४ गावांना ३४,लोणार तालुक्यातील १७ गावांना १९ खाजगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. या गावातील सुमारे १ लाख ३० ग्रामीण नागरिकांची तहान यातून भागविली जात आहे.

जिल्ह्यातील ५१ लहान मोठया सिंचन प्रकल्पात आता नाममात्र जलसाठा उपलब्ध आहे. पेन टाकळी, खडकपूर्णा आणि नळगंगा या तीन मोठ्या धरणात मिळून सरासरी ११.१८ टक्केच जलसाठा आहे. खडकपूर्णामध्ये केवळ मृत जलसाठाच आहे. मस, मन, पलढग, कोराडी, तोरणा, उतावळी, ज्ञानगंगा या सात मध्यम प्रकल्पात मिळून २८.२६ टक्केच जलसाठा उरला आहे. ३७ लघु प्रकल्प व ४ कोल्हापूर बंधाऱ्यात जेमतेम १३.०७ टक्के जलसाठा आहे.

आणखी वाचा-दुर्दैवी… तीन रोहींचा विहिरीत पडून मृत्यू; पाण्याच्या शोधात भटकंती, वनविभागाची उदासीनता

दुष्काळात तेरावा महिना

पाणी टंचाईने ग्रामस्थ हवालदिल असताना निसर्गाच्या तांडवाने ६ तालुक्यांना मोठा तडाखा दिला. २६ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने ४ व्यक्ती तर १७ लहान मोठी जनावरे दगावली. मोताळा, शेगाव, जळगाव, नांदुरा, मलकापूर मेहकर तालुक्यातील १३१ गावांतील घरांना तडाखा बसला. तब्बल ५८३८ घरांची अंशतः तर १६० घरांची पूर्णतः पडझड झाली. दुसरीकडे ७५ गावातील ३४८.५८ हेक्टर वरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले.