अकोला : राज्यावर जलसंकटाचे काळे ढग कायम आहेत. मोसमी पाऊस लांबल्याने यंदा राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात घट झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा ५.८६ टक्क्याने कमी आहे. राज्यातील धरणांमध्ये २५ जून रोजी २०.२८ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी याच दिवशी २६.१४ टक्के जलसाठा होता. अमरावती विभागात सर्वाधिक ३७.४५ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी ९.४८ टक्के जलसाठा आहे. राज्यातील जलसाठ्यात वाढ होण्यासाठी दमदार मोसमी पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
राज्यात सर्वव्यापी मोसमी पाऊस झालेला नाही. मोसमी पावसाअभावी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे नभाकडे लागले आहेत. त्यातच आता राज्यातील विविध धरणांमधील जलसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे. राज्यात मोठे, मध्यम व लघु असे सर्व धरणांची संख्या दोन हजार ९९७ आहे. त्यामध्ये प्रकल्पीय पाणीसाठा मृत सात हजार ७५६.४ व उपयुक्त ४० हजार ४९८.४१ असा एकूण ४८ हजार २५४.२ द.ल.घ.मी. क्षमता आहे. राज्यातील धरणांमध्ये २५ जून रोजी उपयुक्त आठ हजार २१३.२९ द.ल.घ.मी. जलसाठा असून एकूण साठा १४ हजार ८३५.९० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. धरणांच्या एकूण क्षमतेच्या २०.२८ टक्के जल उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ही टक्केवारी २६.१४ होती.
राज्यात एकूण मोठे प्रकल्प १३८ आहेत. त्याची एकूण क्षमता ३५ हजार ५४३.२९ द.ल.घ.मी. असून सध्या उपयुक्त पाच हजार ०५६, तर एकूण १० हजार ६०८.४७ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. एकूण क्षमतेच्या तुलनेत १७.३९ टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील २६० मध्यम प्रकल्पांमध्ये ३०.६५ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी तो ३८.७९ टक्के होता. राज्यात सर्वाधिक दोन हजार ५९९ लघु प्रकल्प आहेत. त्याची एकूण क्षमता सहा हजार ५२९.११ द.ल.घ.मी. असून सध्या उपयुक्त एक हजार ४६९.७९, तर एकूण एक हजार ९४७ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. त्याची टक्केवारी २४.८० आहे. गेल्यावर्षी लघु प्रकल्पांमध्ये २९.१४ टक्के जलसाठा होता. राज्यातील पुणे वगळता उर्वरित पाचही विभागांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा उपलब्ध आहे.
हेही वाचा…नागपूर : आधीच रस्ते अरुंद, त्यात जड वाहने, शहर बसेसची वर्दळ; अंबाझरी परिसरात वाहतूक कोंडीचा कळस
धरण संख्या सर्वाधिक, साठा मात्र सर्वात कमी
राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक ९२० धरणांची संख्या आहे. मात्र, याच विभागात सध्या सर्वात कमी ९.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
विभागनिहाय जलसाठा (टक्केवारी)
विभाग आजचा गेल्यावर्षीचा
नागपूर ३५.६६ ३९.२८
अमरावती ३७.४५ ४४.२९
छत्रपती संभाजीनगर ९.४८ २८.८०
नाशिक २१.८५ ३४.५७
पुणे १३.६१ ११.८९
कोकण २९.६९ ३१.०१