बुलढाणा : जिल्ह्यात आजअखेर पडलेला सरासरी पाऊस २०० मिलिमीटरच्या घरात असून अनेक तालुक्यात पावसाने द्विशतक पार केले आहे. मात्र जिल्ह्यावरील जलसंकटाचे सावट कायमच असल्याचे भीषण व दुर्दैवी चित्र आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या (७६१.६ मिलिमीटर) जिल्ह्यात आज १ जुलै अखेर १८७.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. याची टक्केवारी २६ टक्के इतकी आहे. जळगाव जामोद (२६० मिमी), बुलढाणा (२२० मिमी), लोणार (२०७ मिमी) आणि सिंदखेडराजा (२०१ मिमी) या तालुक्यात पावसाने द्विशतक पार केले आहे. चिखली (१७६ मिमी), देऊळगाव राजा (१८९ मिमी), मेहकर (१६८ मिमी), खामगाव (१५६ मिमी), शेगाव (१५२ मिमी), मलकापूर (१७२ मिमी), नांदुरा (१७६), मोताळा (१८८), संग्रामपूर( १७० मिमी) या तालुक्यांतही समाधानकारक पाऊस झाला आहे.
धरणात जलसाठा किती?
पाऊस चांगला झालेला असला तरी जिल्ह्यातील धरणात आज रोजी अल्प जलसाठा उपलब्ध आहे. मोठ्या धरणांपैकी (बृहत) खडकपूर्णा प्रकल्पात अजूनही शून्य टक्केच जलसाठा आहे. पेन टाकळी प्रकल्पात ११.९२ टक्के तर नळगंगा प्रकल्पात २६.६७ टक्के इतकाच जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांची अशीच बिकट स्थिती आहे. तोरणा (७.८६ टक्के), कोराडी (१४.५५ टक्के), मन (१२ टक्के), उतावळी (१६.९३ टक्के), मस (२६.९९ टक्के), ज्ञानगंगा (३०.३९ टक्के), पलढग (३४.८९ टक्के), अशी धरणातील जलसाठ्याची टक्केवारी काहीशी चिंताजनकच आहे.
लाखो ग्रामस्थांचे बेहाल
दुसरीकडे जुलै महिना ओलांडला असला तरी पाणीटंचाई जिल्ह्याच्या मानगुटीला बसलेलीच आहे. आजही तब्बल पावणेचार लाख ग्रामस्थांची तहान टँकर आणि खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे भागविली जात आहे. तीन महिन्यांपासून मानगुटीला बसलेल्या या टंचाईमुळे लाखो ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ७४ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी २ लाख २० हजार ८२९ ग्रामस्थांचे बेहाल होत आहे. त्यांच्यावर पावसाळ्यातही दूरवर भटकंती करण्याची दुदैवी वेळ आली आहे. दुसरीकडे, ८ तालुक्यांतील २९१ गावांना ३४७ अधिग्रहित खासगी विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे कमीअधिक पावणेचार लाख ग्रामस्थांची ससेहोलपट जुलै महिला लागला तरी कायम आहे. त्यांची ही ससेहोलपट आणखी किती दिवस कायम राहते? हा प्रश्नच आहे.
हेही वाचा : नागपूर : कागदावर ९० टक्के वृक्षारोपण, प्रत्यक्षात मात्र शून्य…’एनएचएआय’चा अजब कारभार
खर्च ११ कोटींवर
यंदा जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले, फेब्रुवारीमध्ये यात वाढ झाली. मार्चपासून याची तीव्रता क्रमाक्रमाने वाढत गेली. पाणीटंचाई कृती आराखड्यातील ७५६ उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. यावर आजअखेर ११.११ कोटी रुपये खर्ची झाले असून शासनाकडून ४.१३ कोटी रुपये इतका निधी मिळाला आहे. अजूनही ७ कोटी ४२ लाख इतका निधी शासनाकडे रखडला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना पाणीटंचाई सोबतच निधीटंचाईचा देखील सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.