अमरावती : मोसमी पावसाच्या आगमनाची महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नेमक्या अशा परिस्थितीत अमरावती विभागात जनतेच्या घशाची कोरड वाढत चालली आहे. २५ गावांसाठी २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महिनाभरात अकरा टँकर वाढले आहेत. सर्वाधिक १७ टँकर बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ ठिकाणी टँकर सुरू आहेत. त्यात चिखलदरा तालुक्यात तीन ठिकाणी आणि चांदूर रेल्वे तालुक्यात एका ठिकाणी टँकर सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील १६ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील वरवंड, पिंपरखेड, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, गोंधनखेड, सावळा व देव्हारी या गावांचा समावेश आहे. याशिवाय सावरगाव माळ (सिंदखेडराजा), पोखरी, तपोवन (मोताळा), वरवंड (मेहकर), धोडप, डोंगरशेवली (चिखली), किनगाव जट्टू (लोणार) या गावातही टँकर सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये तर वाशीम जिल्ह्यातील एका गावाला टँकरने पाणी पुरवले जात आहे.
हेही वाचा – मुंबईत फडणवीस – ठाकरे भेट, नागपुरात भाजपाकडून मनसेला खिंडार
पश्चिम विदर्भातील १० मोठ्या प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ४१.९८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक ४६५.९९ दलघमी जलसाठा यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणात, त्या खालोखाल २५० दशलक्ष घनमीटर जलसाठा अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात, तर सर्वात कमी म्हणजे १०.२० दलघमी जलसाठा बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात आहे.