चंद्रपूर : जिल्ह्यातील १३९ पोलीस ठाणे व कार्यालयाकडे ८१ लाखाचे वीज बिल थकीत आहे. महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाने थकीत वीजबिल वसूलीसाठी मोहिमेत गिरनार चौकातील पोलीस वसाहतीचे १ लाख ७७ हजाराचे बिल थकीत असल्याने पाणी पुरवठ्याचे वीज जोडणी खंडीत केली.
त्यामुळे संतापलेल्या पोलीस विभागाने महावितरण कार्यालयाचे जवळ ठिय्या लावून वीज कर्मचाऱ्यांच्या गाड्या चालान करण्याचे काम सुरू केले आहे. तुम्ही वीज जोडणी खंडीत कराल तर आम्ही गाड्या चालान करू, असाच संदेश पोलीसांनी दिला आहे.
महावितरण चंद्रपूर परिमंडळाने आर्थिक वर्षाची अखेर बघता थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची मोहिम सुरू केली आहे. याच मोहिमेत महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी रणरणत्या उन्हात घरा घरा पर्यंत पोहचून तसेच शासकीय कार्यालय गाठून वीज बिल भरा अन्यथा वीज जोडणी खंडीत करण्याचे काम सुरू केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अखत्यारित जिल्ह्यात एकूण १३९ पोलीस ठाणे व कार्यालयात वीज जोडणी आहे. या सर्व वीज जोडणीचे ८१ लाखाचे वीज बिल मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला वीज बिल भरणा करण्याची सूचना वारंवार दिली. मात्र थकीत बिल भरल्या गेले नाही. तशातच शहरातील गिरनार चौकात पोलीस वसाहतीचे पाणी पुरवठ्याच्या योजनेचे १ लाख ७७ हजाराचे वीज बील थकीत आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा ठप्प केला. वीज बिल भरा, तेव्हाच वीज जोडणी पूर्ववत करू असे पोलीस विभागाला सांगितले.
पोलीस विभागाने वीज बिल भरण्याऐवजी महावितरणच्या बाबुपेठ येथील परिमंडळाच्या कार्यालयाचे जवळ वाहतुक पोलीसांची गाडी लावली आणि महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुचाकी व चार चाकी वाहने चालान करणे सुरू केले. दरम्यान या प्रकाराने महावितरणचे अधिकारी चक्रावले. विशेष म्हणजे, पोलीसांनी तुम्ही वीज कनेक्शन कापाल तर आम्ही तुमच्या गाड्या चालान करू असाच संदेश महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या नियमित चालात होत होत्या. हा विषय वरिष्ठांपर्यंत गेला. त्यानंतर दोन्ही विभागाच्या वरिष्ठांमध्ये चर्चा झाली. चर्चेअंती महावितरणने पोलीस वसाहत येथील पाणी पुरवठ्याची वीज जोडणी पून्हा जोडली. त्यानंतर हा वाद मिटला. यासंदर्भात महावितरणचे जनसंपर्क अधिकारी गणेश चाचेरकर यांचेशी संपर्क साधला असता,त्यांनी दोन्ही कार्यालयांमधील वरिष्ठांमध्ये चर्चा झाल्यानंतर प्रकरण निवळल्याची माहिती दिली.