गोंदिया : जिल्हयातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावे व शहरांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विविध कारणांमुळे ही योजना वारंवार बंद पडल्याने ५ हजार १०० हून अधिक नळजोडणी धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. १० डिसेंबर रोजी या योजनेच्या कांगाटोला गावात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पंपाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने योजनेत समाविष्ट गावांना पाणीपुरवठा झाला नव्हताच पुन्हा ३ दिवसही लोटत नाहीत. तोच त्यानंतर १३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे देवरी शाखा अभियंता राजेंद्र सातदेवे यांनी सांगितले की, बणगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील ऑन-ग्रीड सोलर व पंप दुरुस्ती व इतर आवश्यक कामांमुळे सोमवार १६ व मंगळवार १७ डिसेंबर रोजी सर्व पुन्हा  आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील या ४८ गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात येणाऱ्या दोन्ही तालुक्यांतील ४८ गावे व शहरांतील नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सध्या पण दोन दिवसाआड पाणीपुरवठा बंदच होत  असल्याची चर्चा येथील रहिवासी  करित आहेत. मात्र या वेळी ही दोन दिवसात दुरुस्तीची कामे पूर्णपणे होतात की यापेक्षा जास्त वेळ लागेल हे काहीच नाकारता येत नाही.

हेही वाचा >>>अमरावती : प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजना आता बाह्ययंत्रणेकडून! काय होणार परिणाम…

दोन दिवसांतून एकदाच मिळते पाणी

बणगाव पाणीपुरवठा योजनेद्वारे दोन दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना आपल्या घरात एक दिवसाचा पाणीसाठा ठेवावा लागतो, मात्र जास्त काळ पाणीपुरवठा बंद राहिल्यास पाण्यासाठी इकडे-तिकडे भटकंती करावी लागत आहे. या ४८ गावातील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या केन विकत घ्याव्या लागतात. किंवा दूरवरच्या भागातून पाण्याची व्यवस्था करावी लागते. अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना देऊनही नळांमधून पाणी येत नाही अश्या एक ना अनेक समस्या या परिसरातील नागरिकांना लागत आहेत.

हेही वाचा >>>राज्यभरात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू महिलांचा… माहिती अधिकारात…

जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित

गोंदिया जिल्हयातील पाणी गुणवत्ता समितीने केलेल्या पाणी स्रोताच्या तपासणीचा अहवाल नुकताच जाहीर झाला. या अहवालात जिल्ह्यातील ५४९ ग्रामपंचायतींची परिस्थिती पाहता दूषित पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात आढळले. तब्बल १०४ ग्रामपंचायती अंतर्गत पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याने त्या गावातील पाणी पिण्यायोग्य नाही. परंतु त्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी वापरता येते. यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील ५४९ पैकी १०४ ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याने त्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाने त्या ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. तसेच दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि खबरदारी घेणे अधिक आवश्यक असल्याचे सांगितले आहे. दूषित पाण्यामुळेच मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, ताप, पोटातील जंतुसंसर्ग आदींचा फैलाव होतो. जलजन्य रोग हे दूषित पाण्याच्या स्रोतांमध्ये असलेल्या सूक्ष्मजीव किंवा परजीवीमुळे होणारे असे आजार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे त्यामुळेच वेळोवेळी पाण्याचे स्रोत तपासले जातात.

Story img Loader