पाण्याच्या पातळीने दोन वर्षांतील निच्चांक गाठला
राज्य सरकारने पाणी संकटावर ठोस निर्णय न घेतल्याने पुढच्या काळात पाणी संकट ओढवणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रमुख धरणांत यंदा गेल्या दोन वर्षांतील पाण्याच्या पातळीने निच्चांक गाठला आहे. पेंच प्रकाल्पावरील तोतलाडोहमध्ये केवळ १५.०५ तर नवैगाव खैरी धरणात ३४.६० टक्के जलसाठा शिल्लक आहे. २०१५ ला तोतलाडोह मध्ये जलसाठा ७१३.४९ होता तो आता १५३.०६ दशलक्ष घनमीटर शिल्लक आहे. नवैगाव खैरीमध्ये ७७.४९ जलसाठा कमी होऊन तो ५८.२७ टक्क्यावर आला आहे.
सध्या हिवाळ्यातच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अशातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणात जलसाठा झपाटय़ाने कमी होत असल्याने नागपूरकरांची चिंता अधिक वाढली आहे. यंदा पावसानेही दगा दिला आणि सरसरीपेक्षा कमी पाऊस पडला. १ जून २०१८ पासून केवळ ७२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्यावर्षी ७७० मि.मी. होती. त्यामुळे मुळातच धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. तसेच आता पाऊस पडण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाही. तसेच दररोज धरणांची पातळी खालावत चालली आहे.
नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाण्याची गरज आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात केवळ १५३.०६ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर
नवैगाव खैरीतही ५८.२७ टक्के पाणी आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर दोन्ही धरणातील जलसाठय़ाने यंदा निच्चांक गाठल्याचे दिसून येते.
तोतलाडोह,नवैगाव खैरीतील जलसाठा वाढवण्यासाठी आम्ही नऊ ठिकाणांहून पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. कन्हान नदीचे बरेच पाणी वाहून जाते, ते वळवले जात आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल शासनदरबारी पाठवला आहे.
– जितेंद्र तुरखेडे, कार्यकारी अभियंता पेंच प्रकल्प