वाशीम : शासनाने दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रास आळा बसावा म्हणून यू.डी.आय.डी. अपंग ‘ऑनलाईन’ प्रमाणपत्र सुरू केले आहे. मात्र, तरीही बनावट कागपत्रांद्वारे नोकऱ्या बळकावल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार वाशीम येथे उघडकीस आला आहे.यवतमाळ येथील सोनल प्रकाश गावंडे या महिलेने वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे बनावट कागदपत्रे पत्रे जोडून अपंग प्रमाणपत्राच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यात १८ वर्षे शिक्षिका म्हणून नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वाशीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बनावट अपंगांच्या प्रमाणपत्राचा प्रश्न उपस्थित होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी सोनल प्रकाश गावंडे या महिलेने पांढरकवडा नगर परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी केली. ती दिव्यांग नसतानाही अपंग अनुशेष भरतीमधून २००९ मध्ये तिने नियुक्ती मिळवली असून तिच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी. म्हणून फिर्यादी मयूर सदानंद मेश्राम, रा. हिवरा (बु), ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती यांनी शिक्षण विभागात तक्रार केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने आदेश दिले होते. सोनल प्रकाश गावंडे यांनी वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात २ सप्टेंबर २०२२ रोजी दिव्यांग यू.डी.आय.डी. ऑनलाईन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत तिने ऑफलाईनचे बोगस अपंग प्रमाणपत्र, बोगस आधारकार्डच्या आधारे वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी दाखवून त्या आधारे ऑनलाईनचे बोगस यू.डी.आय.डी. प्रमाणपत्र संबंधित विभागाला सादर केले. त्या सर्व प्रमाणपत्राची रुग्णालयामार्फत पडताळणी केली असता सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले व तसे जिल्हा रुग्णालयाने लेखी पत्राद्वारे कळवले आहे.