नागपूर : विरोधी पक्षातील नेत्यांची पाटणा येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये त्यांनी फक्त भविष्यात त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, हे जरी जाहीर केले तरी ही बैठक महत्त्वाची ठरेल. आमच्याकडे मोदी आहेत. विरोधकांचा नेता काेण, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान राज्याचे वनमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
मुनगंटीवार गुरुवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात प्रभाव बघता सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. परंतु, मोदींच्या मागे जनता आहे. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची आधी जशी काळजी घेतली तशीच काळजी त्यांनी २०२४ मध्येही घेतली तर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. अजित पवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असू शकतात. कारण उमेदवार जाहीर करताना एबी फॉर्मवर अखेरीस पक्षाध्यक्षाची स्वाक्षरी असते. भविष्याचा वेध घेत अजित पवार असे बोलले असावे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा >>> वादग्रस्त ‘पोस्ट’प्रकरणातील अटक बेकायदेशीर!; पुणे, नागपुरातील दोन्ही युवकांना जामीन
बीआरएसचा तेलंगणामध्ये पराभव होण्याची शक्यता आहे. केसीआर यांची मुलगी तेलंगणामध्ये का हरली, त्यांचे अनेक मंत्री भाजपमध्ये का प्रवेश करत आहेत, याबाबत त्यांना विचारले पाहिजे. भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चंद्रपूरमधील ओबीसी समाजाचे नेते अशोक जीवतोडे आणि राजूरकर हजारो कार्यकर्त्यांसह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.