नागपूर : भाजपला मतदान केले तर मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवले जाईल, असा प्रचार गेल्या निवडणुकीत काँग्रेसने केला होता, पण मी  निवडून आल्यावर भेदभावपूर्ण राजकारण केले नाही. हा देश एका जातीचा, धर्माचा किंवा भाषा बोलणाऱ्यांचा नाही तर देशावर प्रेम करणाऱ्यांचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना नंदनवन येथील राजेंद्रनगर चौकात आयोजित कार्यक्रमात पट्टे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते.

मी जातीपातीचे नव्हे तर सेवा आणि विकासाचे राजकारण केले. उज्ज्वल गॅस योजनेत जात, धर्म पाहून सिलिंडर वाटले नाही. विकासात भेदभाद केला नाही, परंतु ज्यांना विकास कामाच्याआधारावर लोकांपुढे जाता येत नाही. तेच लोक जातीयता आणि सांप्रदायिकतेचे विष कालवून लोकांना घाबरवण्याचे काम करतात, असा टोला गडकरी यांनी काँग्रेसला हाणला. भाजप निवडून आल्यास मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवतील, असे हेच लोक सांगत होते. निवडून आल्यावर कोणावर अत्याचार केला आणि कोणाला घाबरवले का, असा सवालही त्यांनी केला.  आम्ही जात मानत नाही. भाजपला हसनबागमधून केवळ आठ मते मिळाली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागात विकास कार्य करू नका, अशी भूमिका घेतली नाही.  जात,धर्म, भाषा न बघता विकास केला,असे गडकरी म्हणाले.

मिहानमध्ये रोजगार नेमका किती ?

गेल्या सरकारच्या धोरणामुळे मिहानमधील अनेक कंपनी निघून गेल्या होत्या. आमची सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री आणि मी त्या उद्योजकांना हात जोडून विनंती केली. त्यामुळे मिहानमध्ये उद्योग सुरू झाले. मिहान आतापर्यंत २२ हजार तरुणांना काम मिळाले. गेल्या निवडणुकीआधी आम्ही पाच वर्षांत ५० हजार रोजगार देण्याचा संकल्प केला होता, असेही गडकरी म्हणाले. दोन आठवडय़ापूर्वी दक्षिण नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात मिहानमध्ये २६ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे, असे गडकरी म्हणाले होते.

तीन वर्षांत भांडेवाडी कचरामुक्त

सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या राज्यातील १० लाख लोकांना मालकीपट्टे देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भांडेवाडीमधील कचऱ्याच्या प्रश्न येत्या तीन वर्षांत मिटणार आहे. येथे बायो मायनिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यामुळे या भागात कचरा दिसणार नाही. सर्व जागा मोकळी होईल. तेथे उद्यान, मैदान किंवा गृहनिर्माण प्रकल्प राबवता येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Story img Loader