नागपूर : राज्यात उशीरा सुरू झालेली थंडी कायमस्वरुपी नाही, असेच काहीसे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावरुन स्पष्ट होत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू झालेली थंडी आठ दिवस होत नाही तोच परतली. ‘फेईंगल’ चक्रीवादळाने ही थंडी परतावून लावली. त्यानंतर पुन्हा आता गेल्या काही दिवसांपासून थंडीला सुरुवात होत असतानाच हवामान खात्याने वाढलेली थंडी रविवारनंतर काहीशी कमी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हिवाळ्यातील थंडीचा कडाका अजूनही नागरिकांना हवा तसा अनुभवता आलेला नाही.
उत्तरेकडील राज्यांमध्ये कोरडे आणि थंड वारे वाहत आहेत. मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. संपूर्ण राज्यातच विदर्भ, मराठवाडा, कोकण आदी विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली गेला आहे. विदर्भात देखील यंदाच्या मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद ८.८ अंश सेल्सिअस झाली आहे. तर कमाल तापमानात देखील बऱ्याच अंशी घट झाली आहे. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात बऱ्याच अंशी घट झाली आहे. मात्र, आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ही थंडीची लाट रविवारनंतर काहीशी ओसरणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या २४ तासात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>महिलांना अनुदानावर पिंक ई-रिक्षा ; ६०० महिलांना मिळणार अर्थसाहाय्य
चक्राकार वाऱ्याची स्थिती बदलणार असल्याने कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या तीन ते चार दिवसात कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विदर्भात थंडी कायम राहील. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहील. तर येत्या २४ तासात मात्र हवामानात बदल होणार असून कमाल व किमान तापमानात वाढ होणार असल्याचे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विदर्भात किमान तापमानात बऱ्याच अंशी घसरण झाली आहे. विदर्भातील किमान तापमान दहा अंशाच्या खाली गेले असून शनिवारी सकाळी ते ८.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. या तापमानात अजूनतरी फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तर कमाल तापमानात देखील बऱ्याची अंशी घसरण झाली आहे. विदर्भात कमाल तापमान २६.२ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमी नोंदवण्यात आले.