नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने आता पुन्हा एकदा नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका (वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा) व चक्रवातीय वारे सक्रिय आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्द्र वारे विदर्भात येत आहेत. यामुळे विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, काही जिल्ह्यांमध्ये विजांसह व जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ४० ते ५० किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील तापमान अन्य दिवसांच्या तुलनेत जास्त राहण्याची शक्यता आहे. उशिरा रात्री पावसाची शक्यता असल्यामुळे दिवसाच्या तापमानावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, पुढील पाच दिवसांसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. पावसाचे वातावरण निवळल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

हवामानात कोणता बदल?

काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तो आता कमजोर झाला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिम भागापासून विदर्भाच्या उत्तर भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. सध्या राज्यातील बहुतेक ठिकाणी तापमान ४० अंशांच्या आसपास आहे. तरीही, किनारपट्टी भागातील तापमानात काहीशी घट नोंदवली गेली. विदर्भाव्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील काही भागात उद्या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.

पावसाचा अंदाज कुठे?

विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यात उद्या, तर चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

उन्हाचा चटका कुठे?

छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट हवामान राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी तर बीड जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी तसेच लातूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला. पुणे, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उष्ण आणि दमट हवामान असेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.