नागपूर : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. रात्री आणि पहाटे गारवा तर दिवसा मात्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यातील तापमान केव्हाच ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० वर पोहोचले आहे.उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदवले जात आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत तापमानात मोठा बदल जाणवत आहे. सुमारे चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ठाण्यात ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

सांगलीत ३७.१ अंश सेल्सिअस एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने तापमानसंदर्भात नवा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसांत तापमान चढेच राहणार असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.विदर्भात गेल्या २४ तासांत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा चटका प्रचंड जाणवत आहे. मंगळवार, १८ फेब्रुवारीला अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच ३७ ८ अंश सेल्सियसची नोंद झाली. ब्रम्हपुरीत देखील साधारण असेच तापमान होते. अमरावती येथे ३६.४ अंश सेल्सियस तापमान होते. वाशिम जिल्ह्यात देखील ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता.

दरम्यान, प्रादेशिक हवामान खात्यानुसार विदर्भात दोन दिवसांनी काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार राज्यतील काही भागांत तापमानात वाढ होणार आहे. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान एक ते दोन १ ते २ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र,त्यानंतर तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस कमाल तापमान स्थिर राहील. किमान तापमानातही पुढील तीन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमान दोन ते तीन अंशांनी घटू शकते. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील किमान तापमान पुढील तीन दिवसांपर्यंत स्थिर राहील. मात्र, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान एक ते दोन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

Story img Loader