अजित पवार यांची टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक जाहीर झालेल्या राज्यांना कोळसा कमी पडू नये म्हणून महाराष्ट्रातील वीज प्रकल्पांना कमी कोळसा दिला जात आहे. परिणामी, राज्यात भारनियमनाची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

काटोल येथील एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी आज मंगळवारी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात दुष्काळ पडला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी चोवीस तास विजेची गरज आहे, परंतु राज्यात भारनियन केले जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात निवडणुका आहेत. तेथे भारनियमिन नको म्हणून महाराष्ट्राच्या वाटय़ाचा कोळसा त्या राज्याकडे वळवण्यात आला, अशी शंका आहे. पाच राज्यातील निवडणुकांचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत  आहे. यासंदर्भातील बातम्या देखील प्रकाशित झाल्या आहेत. आमचे सरकार असताना दुष्काळ स्थितीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीज देण्यात येत होती. या सरकारचे अगदी उलट आहे. डाळिंब, द्राक्षे आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची देखील गंभीर स्थिती निर्माण होणार आहे.  त्यामुळे राज्य सरकारने या स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करावी. तसेच जिल्हाधिकारी यांना सर्वाधिकार द्यावे.

अधिकाऱ्यांचा वेळ निव्वळ व्हिडीओ कॉफरन्समध्ये जातो. त्यांना दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी वेळ नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांत दुष्काळाची भीषण स्थिती आहे. दुष्काळामुळे येत्या पाच महिन्यात सरकारला अर्थसंकल्पात कपात करावी लागणार, हे आताच सांगतो.  तलाव, धरणातील पाणी टिकवण्यासाठी सरकारला प्रयत्न करायाला हवेत. या पाण्याचे बाष्पीकरण थांबवायसाठी सरकारने उद्योजकांना साद घालून सामाजिक दायित्व निधी पाणी आणि पाण्यासंबंधी उपायोजनांवर खर्च करावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weightage due to the five state elections