लोकसत्ता टीम
अकोला : संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त शहरातून मंगळवारी सकाळी दुचाकी यात्रा काढून नववर्षाचे चैतन्यमय वातावरणात स्वागत केले. पारंपरिक वेशभूषेतील तरूणाईसह नागरिकांचा यात्रात प्रचंड उत्साह दिसून आला.
स्वागत यात्रेचा प्रारंभ शहराचे आराध्यदैवत श्री. राजराजेश्वर मंदिरात महापुजेने झाला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा, कार्याध्यक्ष हरीश आलिमचंदानी, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष विनोद देव, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, अकोला नगराचे संघचालक गोपाल खंडेलवाल, दि बेरार संस्थेचे अध्यक्ष मोतीसिंह मोहता, श्री राजराजेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त गजानन घोंगे, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा, नीलेश देव, समीर थोडगे, स्वानंद कोंडोलीकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आणखी वाचा-महानिर्मितीच्या ‘या’ संचातून सलग २६७ दिवस वीज निर्मिती, उन्हाळ्यातील वीज संकटावर…
ही यात्रा काळा मारोती, शहर कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, श्री.राणी सती मंदिर, न्यू राधाकिसान प्लॉट मार्गे अशोक वाटिका, मदनलाल धिंग्रा चौकातून टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन चौकातून जवाहर नगर चौक, बाराज्योतिर्लिंग मंदिर, राऊतवाडी, जठारपेठ, सातव चौक मार्गे बिर्ला राम मंदिर येथे दाखल झाली. रामरक्षा पठण व महाआरतीने यात्रेचा समारोप झाला. या यात्रेतील मार्गात येणार्या सर्व मंदिरांना ध्वज प्रदान करण्यात आले. यात्रेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, रामभक्त श्री हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करून फुलांची उधळण करण्यात आली. चौकाचौकात आकर्षक रांगोळ्या व भगव्या पताकाची सजावट लक्षवेधक होती. या यात्रेत पारंपरिक वेशभूषेत फेटे घालून तरूणाई, मातृशक्ति व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्याने मतदानाची जनजागृती यात्रेतून करण्यात आली. सहभागी नागरिक विविध प्रकारचे फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत होते.
२००६ पासून जोपासली परंपरा
हिंदू संस्कृतीचे संवर्धन व नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी समितीची स्थापना २००६ साली डॉ. आर. बी. हेडा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. समितीच्यावतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यासह विविध उपक्रम राबविले जातात. डॉ.हेडा यांच्या नेतृत्वात १६ वर्ष स्वागत यात्रेची परंपरा जोपासली. यंदा कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आला.