बुलढाणा : करोडो रुपयांचा खर्च, शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प, सर्व काही राजेशाही असा थाट पण ‘भय इथलं संपत नाही’ अशी समृद्धी महामार्गाची स्थिती सध्या झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग प्रारंभी अपघातांनी गाजला.नंतर गुन्हेगार टोळ्यांच्या पराक्रमानी चर्चेत आला. आता अपघात आणि गुन्हेगारीच्या घटनांनी गाजत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धी महामार्ग हा सुसाट झाला, वेळेची, इंधनाची बचत होतेय पण सुरक्षित कोण ?या प्रश्नाचे उत्तर कुणीच नाही असेच आहे. डिझेल चोरी, अपघात, चोरांचा जिवंत होरपाळून मृत्यू, भीषण आगीत २५ प्रवाश्यांचा जळून कोळसा होणे या व इतर अश्याच घटनांनी हा आरोप सिद्ध होतो. या पार्श्वभूमीवर डोणगाव (तालुका मेहकर,जिल्हा बुलढाणा) समृद्धी महामार्ग वर चाळीस पन्नास नव्हे तब्बल पाचशे लिटर डिझेल ची एका सुसज्ज टोळीने चोरी केली. उत्तर रात्री मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर मुंबई कडून नागपूर जाणारे दोन ट्रक चालक विश्रांती घेण्यासाठी आणि इंजिन थंड करण्यासाठी थांबले. मुंबई कडून नागपूर कडे जाणारे एम एच १२ एस एक्स २७८७ व एम एच १२ यु एम ४६५७ दोन ट्रक हे पेट्रोल पंम्प पासून जेमतेम १०० मीटर अंतरावर उभे करण्यात आले होते .लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने चालकांना डुलकी लागली .

ही संधी साधून इंधन चोरांच्या टोळीने दोन्ही वाहनातील सुमारे ५०० लिटर डिझेल लंपास केले.दरम्यान याच मार्गाने जाणाऱ्या एका वाहन धारकने हॉर्न वाजवून दोन्ही ट्रक चालकांना उठवले. तुमच्या वाहनातून डिझेल चोरी होत असल्याची माहिती दिली. चालकांनी खाली उतरून पहिले असता पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेल्या बोलेरो गाडीतून चोरटे पळून गेले. चोरांनी त्यांचे वाहन हे पेट्रोल पंप जवळच असलेल्या खुशकीच्या (कच्च्या) मार्गाने टाकत डोणगावच्या दिशेने पोबारा केला . चालकांनी डोणगाव गाठून डोणगाव पोलिसांना माहिती दिली. हिरालाल यादव मिरझापूर असे एका चालकाचे नाव असून ते उत्तरप्रदेश मधील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे .

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well equipped gang stole 500 liters of diesel on samriddhi highway scm 61 sud 02