लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात सुप्रीम कंपनीच्या नावाखाली बनावट पाइप, पाण्याची टाकी बनविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. याची तक्रार संबंधित कंपनीच्या संचालकांनी थेट पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे केल्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी बनावट पाइप, पाण्याच्या टाक्या आढळून आल्या. पोलिसांनी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन प्रतिष्ठानांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी क्रमांक तीनमधील हिना ट्रेडर्सचे मालक हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया हे सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे बनावट पीव्हीसी पाइपची निर्मिती करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याने कंपनीची बदनामी व आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार कंपनीच्यावतीने करण्यात आली.

आणखी वाचा-चंद्रपूर : हेल्मेट न घातल्याने आठ महिन्यात १२९ दुचाकीस्वारांनी गमावला जीव

एमआयडीसी पोलिसांनी हिना ट्रेडर्स येथे छापा घालून विविध प्रकारचे बनावट पाइपचे १२ बंडल (एकूण ५४१ पाइप) जप्त केले. या बनावट पाइपची एकूण किंमत १ लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. श्रीराम हार्डवेअर कुंभारी रोड शिवर येथील गौरव बुब, गोपाल बुब यांच्याकडेही पोलिसांनी छापा घालून सुप्रीम कंपनीचे बनावट सीपीव्हीसी पाइप आढळून आले. त्याची किंमत ३९ हजार रुपये आहे. तसेच, एमआयडीसी क्रमांक ३ मधील साईधाम प्लास्टिक फॅक्टरीचे राजकुमार लठोरिया यांच्याकडेही छापा घालून सुप्रीम कंपनीच्या बनावट ५०० व १००० लिटर पाण्याची क्षमता असलेल्या प्रत्येकी १४ अशा २८ पाण्याच्या टाकी आढळून आल्या आहेत. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी हितेश सुरेशकुमार वखारीया व संकेत वखारीया, गौरव बुब, गोपाल बुब व राजकुमार लठोरिया यांच्याविरुद्ध ट्रेडमार्क अधिनियम १९९९ कलम १०२,१०३,१०४ कॉपीराइट अधिनियम १९५७ कलम ६३, ६५, आरआयपीसी कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well known company manufactures fake plastic water tanks seized by police ppd 88 mrj