लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील बर्ड फ्लू संक्रमणाबाबतची पाहणी व सूक्ष्म अभ्यास करून अखेर केंद्रीय पथक सोमवारी दिल्लीला रवाना झाले. पथकाच्या सूचनेवरून ३ किलोमीटरपर्यंत महापालिकेकडून झालेल्या बर्ड फ्लूच्या सर्वेक्षणात बरेच करोनाग्रस्त आढळल्याने चिंता वाढली आहे.

नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याचे ४ मार्चच्या दरम्यान पुढे आले होते. त्यानंतर ५ मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्यात आले व केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. घटनेचे गांभीर्य बघत ८ मार्चला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक नागपुरात धडकले होते. केंद्रीय पथकात साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रभाकर झा, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. कमलेश किराड, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सहसंचालक डॉ. नवीन सारंग आणि श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती यांचा समावेश होता. पथकाने दहा दिवस नागपुरात बर्ड फ्लूग्रस्त परिसरासह इतरही भागांना भेटी दिल्या.

आणखी वाचा- मृतदेहाची अवहेलना! रस्त्यावरच दहन, गावात तणाव; जाणून घ्या सविस्तर…

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणासह इतर माहिती गोळा करत त्यांचा सर्वेक्षणाचा परीघ वाढवून एक किलोमीटरवरून तीन किलोमीटर केला. सोबत बर्ड फ्लूग्रस्त कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ कर्मचाऱ्यांचे नमुनेही तपासणीला एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले. त्यापैकी सहा जणांना करोना असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्वेक्षण केलेल्या उबवणी केंद्रातील तीन किलोमीटर परिघातील दीड लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. येथील ७५ जणांचे नमुनेही तपासणीला एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले गेले. त्यापैकी १२ ते १५ जणांना करोना असल्याचे पुढे आले. या रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहे. या सर्व सर्वेक्षण व तपासणीची माहिती घेऊन केंद्रीय पथक सोमवारी दिल्लीला परतले आहे.

मंगळवारी महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात १८ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. त्यामुळे नागपूर महापालिका करोना नियंत्रणासाठी काय उपाय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा- फास्टफूड, जंकफूड खाल्ल्याने वडील रागावले, संतापाच्या भरात मुलीने…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक सोमवारी परतले आहे. महापालिकेने बर्ड फ्लूबाबत केलेल्या सर्वेक्षणात १२ ते १५ नवीन रुग्णांना करोना असल्याचे पुढे आले. परंतु, कुणीही घाबरण्याचे कारण नसून सगळ्याच रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू असून त्यांच्यात एकही लक्षणे नाही. -डॉ. गोवर्धन नवखरे, साथरोग अधिकारी, नागपूर महापालिका.