नागपूर : नागपूर मेट्रो स्थानकावर एक १४ वर्षीय बंगाली भाषिक मुलगा वाट चुकून पोहोचला होता. हिंदी किंवा अन्य स्थानिक भाषा न येण्याच्या कारणाने त्याचा मेट्रो कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात अडथळा येत होता. मात्र, मेट्रो अधिकाऱ्यांनी वेळेवर घेतलेल्या सहृदयी भूमिकेमुळे या मुलाला वाईट घटनेपासून वाचवता आले. बिनोद (नाव बदललेले) नावाचा मुलगा दोसर वैश्य चौक मेट्रो स्थानकावरील तिकीट खिडकीवर पोहोचला.
त्याला बंगाली व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा न येत असल्याने संवाद होणे कठीण झाले. यावेळी स्टेशन कंट्रोलर शुभम बडोले यांनी त्याची ओळख पटवून घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आशा सोनकुसरे (सफाई कर्मचारी, कॉटन मार्केट), या बंगाली भाषिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. बिनोदने सांगितले की, त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क तुटला असून, तो रेल्वे स्थानक शोधण्याचा प्रयत्न करीत होता.
याची माहिती सुरक्षा विभागाचे निरीक्षक गणेश गारकल यांना देण्यात आली. त्यानंतर बिनोदला नागपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाकडे सुपूर्द करण्यात आले. बिनोद हा महिपालपूर, हुगळी जिल्हा, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून, त्याला एफएमएस पर्यवेक्षक प्रेमदास बोरकर यांच्या हस्ते चाईल्डलाईन अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले. चाईल्डलाईनने तातडीने मुलाच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली आहे.