नागपूर : एसटी महामंडळात नुकत्याच झालेल्या ७० हजार ३७८ कोटींच्या (प्रति किलोमीटर ७८ रुपये) करारावर पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात ११ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून त्याबाबत महत्वाची माहिती ठाकरे यांनी मुख्यसचिवांना तक्रारीत चौकशीची मागणी करत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटी महामंडळाने ओलेक्त्रा ग्रीनटेक लिमिटेड आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड, या मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (एमईआयएल) उपकंपन्यांना दिलेल्या ७०,३७८ कोटींच्या (प्रति किलोमीटर ७८ रुपये) करारावर आमदार विकास ठाकरेंनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणात ११ हजार कोटींचा अपव्ययाचा आरोप करत मुख्य सचिवांनी चौकशी करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

हे ही वाचा…विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य नियुक्त

एसटी महामंडळाने केलेल्या करारात ५ हजार १५० इलेक्ट्रिक स्टँडर्ड साईज बसच्या खरेदीसह, १२ वर्षांच्या कालावधीसाठी बसच्या संचालन आणि देखभाल यांचा समावेश आहे. या कराराद्वारे तुलनात्मक करारांपेक्षा ११ हजार ७३० कोटी रुपये जास्त खर्च करत सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा ठाकरेंचा आरोप आहे. नागपूर महानगरपालिकानेही इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला २५० इलेक्ट्रिक बससाठी प्रति किलोमीटर ७८ रुपये या महागड्या दराने करार देण्याचा विचार केला होता, ज्यामुळे १ हजार ४२३.५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत होता. मात्र, ठाकरे यांनी एकाच निविदेवर आक्षेप घेतल्यानंतर, महानगरपालिकाने पुन्हा निविदा काढली आणि प्रति किलोमीटर ६२.९ रुपये कमी दराने करार केला, ज्यामुळे महापालिकेचे २७५.५ कोटी रुपये वाचले. इव्ही ट्रान्सने स्वतः बेस्ट मुंबईच्या २ हजार ४०० इलेक्ट्रिक स्टँडर्ड साईज बससाठी प्रति किलोमीटर ६४ रुपये या दराने निविदा भरली होती.

हे ही वाचा…‘ईपीएस- ९५’योजनेतील वाढीव निवृत्ती वेतनाचा लाभ फक्त ८ कर्मचाऱ्यांनाच; ‘ईपीएफओ’ म्हणते…

दरम्यान एसटी कराराच्या अटी खासगी ऑपरेटरसाठी नागपूर महापालिका आणि बेस्ट मुंबई सारख्या इतर करारांपेक्षा जास्त लाभदायक आहे. नागपूर महानगरपालिका आणि बेस्ट २०० किलोमीटर प्रति बस दररोजच्या पेमेंटची अट ठेवतात, तर एसटीच्या करारात ऑपरेटरला ४०० किलोमीटर प्रतिदिनचे पेमेंट दिले जाते. शिवाय, एसटीचा करार १२ वर्षांचा आहे, तर इतर करारांमध्ये १० वर्षांचा कालावधी आहे. एसटीच्या करारात मोठ्या प्रमाणात बस असतानाही, प्रति किलोमीटर ७८ रुपयांचा दर हा देशातील इतर तुलनात्मक करारांपेक्षा सरासरी ६५ रुपये प्रति किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचाही ठाकरे यांचा आरोप आहे. एसटी महामंडळाने हा करार अपुरी स्पर्धा असलेल्या काळात केल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West nagpur mla vikas thackeray objected to recent agreement of 70 thousand 378 crores rs 78 per km in st corporation mnb 82 sud 02