चंद्रपूर: चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणास तसेच झालेल्या विद्रुपीकरणास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) हेच जबाबदार आहे असे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान वेकोलिने दोन्ही नद्यांचे खोलीकरण करावे, संरक्षण भिंत बांधावी, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य करावे अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. या प्रकरणी वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, प्रसंगी आंदोलनाचा इशाराही पुगलियांनी दिला.
कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी इरई व झरपट नदी प्रदूषित होत आहे. या दोन्ही नद्यांचे अस्तीत्व संपुष्टात येत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केल्याची माहिती माजी खासदार पुगलिया यांनी पत्रपरिषदेत दिली. युवा नेते राहुल पुगलिया, ॲड.अविनाश ठावरी, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, देवेंद्र बेले यांच्या उपस्थितीत माहिती देतांना पुगलिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्रात वेकोलिच नद्यांचे विद्रुपीकरणास कारणीभूत असल्याचे सांगितले असले तरी वेकोलिने न्यायालयात खोटी माहिती सादर केल्याचे म्हटले आहे. या विरूध्द येत्या ३ जुलै रोजी न्यायालयात आमचे वकील वेकोलिला जाब विचारणार असल्याचे पुगलिया म्हणाले.
हेही वाचा : अमरावती : यंदाही अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता
वेकोलिकडून कोळसा उत्पादनानंतर प्रक्रियायुक्त पाणी व कचरा इरई नदीपात्रात सोडले जात असल्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना पाच आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन साबरे, न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्रात वेकोलिच नद्यांच्या विद्रुपीकरणास कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरात पदमापूर कोळसा खाणीची पातळी ही इरई नदीच्या बरोबरीने असल्यामुळे त्यातील वाळूमिश्रीत माती व गाळ हा इरई नदीच्या पात्रात आला आहे. नदीचे रूपांतर नाल्यात होत आहे. भटाळी खाणीतील वाळू मित्रीत माती मान्सून मधील अतिवृष्टी, पावसामुळे नदीच्या पात्रात येते. परंतु वेकोलि हे रोखण्याकरिता आवश्यक झाडांची लागवड करत नाही. भटाळी खाणीत कोळशाची साठवणूक केली जाते. मात्र प्रदूषणास आळा घालण्यासाठी आवश्यक पाणी मारणे थांबविले आहे. कोळसा साठवणूकीकरिता वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावर अल्प पाणी फवारणी करित असल्याने वायू प्रदूषण झाले आहे.
हिंदूस्थान लालपेळ कोळसा खाणीमुळे इरई नदीचे पात्र उथळ झाले आहे. पदमापूर पासून लालपेठ, दुर्गापूर पर्यंत तयार झालेले मातीचे ढिगारे हटविले नाही. त्यामुळे ढिगाऱ्यांची माती थेट नदीपात्रात जाते. या सर्वांला वेकोली जबाबदार असून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या शपथपत्रात म्हटले आहे. या दोन्ही नदी पात्राची खोली व रूंदी कमी झाली असून अतिवृष्टीमुळे चंद्रपूर शहराला पुराचा फटका बसतो. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, महापालिका, सिंचन विभाग, बांधकाम विभाग या सर्वांनी या नद्यांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात चंद्रपूर शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होवू शकते अशीही माहिती पुगलिया यांनी दिली. यावर थातूर मातून उपाययोजना न करता इरई व झरपट नदीवर बंधारा बांधावा, दोन्ही नद्यांचे खोलीकरण, इरई नदीवर डाव्या व उजव्या तिरावर संरक्षण भिंत व विकास कामे करावी, या दोन्ही नद्यांच्या खाेलीकरणाची संपूर्ण जबाबदारी वेकोलिला देण्यात यावी अशीही मागणी पुगलियांनी केली.
हेही वाचा : अमरावतीच्या पक्षीसूचीत सहा नव्या पाहुण्यांची नोंद
संरक्षण भिंत व विकास कामांसाठी लागणारा निधी राज्य सरकारने द्यावा, सरकार निधी देत नसेल तर खनिज विकास निधीतून ही कामे करावी, पालकमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करून दोन्ही नद्यांचे संरक्षण करावे, कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणी टंचाई, पुराचा फटका यापासून जनतेला दिलासा द्यावा, नाग नदीच्या धर्तीवर इरई व झरपट या दोन्ही नद्यांना प्रदूषणमुक्त करून खोलीकरण, संरक्षण भिंत, बंधारा व सुशोभिकरण करावे, अन्यथा जनतेच्या पुढाकाराने आंदोलन करण्याचा इशाराही पुगलिया यांनी दिला.