नागपूर : काळविट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, ज्या वनकर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काळविटाचा जीव गेला, त्यांना वाचवण्याचा आणि काळविटाच्या मृत्यूचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वनखात्याकडून केला जात आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत ‘शेड्युल वन’ या वर्गात येणाऱ्या काळविटाच्या या प्रकरणात वनखात्याकडून गेल्या दहा दिवसांपासून चालढकल केली जात आहे.
नागपूरवरुन २५ किलोमीटर व कन्हानपासून पाच किलोमीटर अंतरावरील खोपडी(खेडी) येथे आठ जुलैला भटक्या श्वानांनी एका काळविटाच्या पिलावर जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना काही गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ काळविटाच्या पिल्याला कुत्राच्या तावडीतून सोडवले. गावच्या सरपंच रेखा वरठी यांनी याची सूचना संजय सत्येकार यांना दिली. सत्येकर यांनी तात्काळ वनविभागाच्या नागपूर येथील बचाव पथकाला दिली. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी श्रीमती देवकते कर्तव्यावर हजर होत्या. बचाव पथकाच्या वनरक्षक अनिता कातकडे या देखील तिथेच होत्या. त्यांनी मेश्राम नावाच्या वनरक्षकाला ही माहिती दिली. मात्र, केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देण्याचेच काम होत गेले. प्रत्यक्षात घटनास्थळी चमू गेलीच नाही.
हेही वाचा >>>बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी
गावकरी दुपारी १२ वाजेपासून वनखात्याला त्या काळविटाचा जीव वाचवण्यासाठी संपर्क करत होते, पण महिला कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. तब्बल पाच वाजता एक कर्मचारी घटनास्थळी गेला, पण तोपर्यंत काळविटाचा जीव गेला होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके मात्र वैयक्तिक कामात व्यस्त होत्या. या घटनेला तब्बल आठ दिवस होत आले, पण अजूनही या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. काळविटाला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी केलेल्या दूरध्वनीची नोंदही रजिस्टरमध्ये करण्यात आली नव्हती. हे प्रकरण अंगावर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर या रजिस्टरमध्ये दूपारची वेळ टाकण्यात आली. प्रत्यक्षात एकही ‘रेस्क्यू कॉल’ नसताना त्यादिवशी चार ‘रेस्क्यू कॉल’ असल्याची नोंद करण्यात आली. या घटनेच्या चौकशी अहवालातही अशाच खोट्या बाबी टाकण्यात आल्या. दरम्यान, या प्रकरणात प्रादेशिक वनखात्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंग हाडा यांनी चौकशी अहवाल आला असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.