९६ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून अपेक्षित पन्नास लक्ष रुपयांच्या निधीचे काय होणार, या शंकेला अद्याप उत्तर नसून ही मदत प्रश्नांकित ठरली आहे.
संमेलनासाठी विशेष बाब म्हणून आमदार निधीवर डोळा गेला. विनंती केल्यावर आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे, अभिजित वंजारी व डॉ. रामदास आंबटकर यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यासाठी प्रशासनास पत्र दिले. पण, आचारसंहिता आल्याने निवडणूक आयोगाकडे विनंतीपत्र गेले. दरम्यान राज्य शासनाने पन्नास लाख अधिक दीड कोटी, अशी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याने आयोजकांचा जीव भांड्यात पडला व आमदार निधी मागे पडला.
हेही वाचा – भंडारा : ‘आय एम सॉरी मम्मी… लव्ह यू’, आईला मेसेज पाठवून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
हेही वाचा – …आणि वाघाचा अपघाती मृत्यू थोडक्यात टळला
दुसरी एक बाब पुढे आली की, केवळ पाच लाख रुपये अनुज्ञेय असतात, तर पत्र दहा लाख रुपयांचे होते. या प्रश्नावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले की दोन कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे. गरज पडल्यासच आमदार निधीचा विचार होईल. तूर्तास ती बाब विचारार्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भव्यदिव्यतेत कुठेच कमी न पडल्याने मोठा खर्च झाला. आता ताळमेळ जुळेल तेव्हा या निधीची गरज पडणार की नाही, हे ठरेल.