लोकसत्ता टीम
नागपूर : उशिरा का होईना अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह व ऊर्जा ही महत्वाची खाती स्वत:कडे कायम ठेवतानाच महसूल, आदिवासी विकास, कामगार, व मृद संधारण ही महत्वाची खाती वैदर्भीय मंत्र्यांकडे सोपवली. प्रथमच मंत्री झालेल्या राज्यमंत्र्यांकडेही काम करता येईल, अशी संधी असलेली खाती देण्यात आली.
विदर्भाला देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्यासह मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), अशोक उईके (राळेगाव), आकाश फुंडकर (खामगाव) या तीन भाजप व शिंदे गटाचे संजय राठोड (दिग्रस) असे चार कॅबिनेट तर भाजपचे पंकज भोयर (वर्धा), शिवसेनेचे आशीष जयस्वाल (रामटेक) व राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक (पुसद) या तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन
मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये झाला. त्यानंतर अधिवेशन सुरू झाले व शेवटच्या दिवशी खातेवाटप झाले. यात विदर्भातील मंत्र्यांना महत्वाची खाती मिळाली आहेत. बावनकुळे यांना महसूल, अशोक उईके यांना आदिवासी विकास, आकाश फुंडकर यांना कामगार आणि संजय राठोड यांना मृदसंधारण हे खाते देण्यात आले. राज्यमंत्र्यांपैकी पंकज भोयर (गृह ग्रामीण),शालेय शिक्षण,मायनिंग,) इंद्रनील नाईक (उद्योग,सा.बा. उच्च शिक्षण) व आशीष जयस्वाल (अर्थ,नियोजन,कृषी) यांना महत्वाची खाती मिळाली आहेत.
ऊर्जाखाते विदर्भातच
गृह आणि ऊर्जाखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. २०१४-२०१९ या काळात ऊर्जाखाते बावनकुळे यांच्याकडे होते. महाविकास ्आघाडी सरकारच्या काळात विदर्भातील नितीन राऊत हे या खात्याचे मंत्री होते. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारमध्ये फडणवीस यांच्याकडे हे खाते होते. यावेळीही ते त्यांनी कायम ठेवले. शिंदे मंत्रिंडळात वन, (सुधीर मुनगंटीवार) व अन्न व औषध प्रशासन (आत्राम)ही खाती विदर्भातील मंत्र्यांकडे होती. हे दोन्ही खाते विदर्भातून गेले असून त्याऐवजी महसूल आणि कामगार ही महत्वाची खाती विदर्भाकडे आली आहेत.
© The Indian Express (P) Ltd