२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. याच आघाडीने तेव्हा भाजपला सत्तेच्या सिंहासनापासून दूर खेचले होते. आणि यंदा या विरोधकांच्या एकत्रित शक्तीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश संपादित केले आहे. महाविकास आघाडीमुळे महायुतीला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फटका बसला आहे. तर इंडिया आघाडीनेही भाजपला देशपातळीवर चुरशीची लढत दिली. दरम्यान या घडामोडींवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झी मराठीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवारांचे कौतुक केले असून ते कोणताही चमत्कार घडव शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
भारतातील सर्व पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहे. वरिष्ठ नेते म्हणून त्यांनाही सर्व मानतात. इंडिया आघाडीचे यश पाहून नितीश कुमार यांच्यात चलबिचल असेल, त्यामुळे फोन केला असावा, इंडिया आघाडीला जे समर्थन मिळत आहे ते बघता, त्यांची काही चर्चा झाली असावी, असे अनिल देशमुख म्हणाले.
२०१९ मध्ये पवारांच्या नेतृत्वात राज्यातील विधानसभेचे चित्र बदलले होते. त्यामुले आताच्याही घडामोडींमध्ये त्यांची मोठी भूमिका असेल का या प्रश्नावर, शरद पवारांनी सर्वांना एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन केली. आता पवार यांचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने ते काहीही घडवू शकतात. पण ज्या पद्धतीने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन संपूर्ण देशात एकत्र निवडणूक लढवली, त्याच्यामुळे आघाडीला यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातही चमत्कार घडण्याची परिस्थिती दिसते, असे देशमुख म्हणाले.
मला अजूनही खात्री आहे. आमच्या १० पैकी नऊ जांगा जिंकून येतील. सर्व मित्रपक्षांनी जी आघाडी स्थापनकेली, त्यामुळे चांगले यश मिळत आहे. याचा परिणाम पुढील विधानसभेच्या निवडणुकीवर दिसतील, असे अनिल देशमुख म्हणाले.
अठरावी लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली
अठरावी लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली, कारण यंदाच्या निवडणुका या संसदीय निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात तणावपूर्ण निवडणुका ठरल्या. मगाली दोन निवडणुकीत म्हणजेच २०१४ आणि २०१९ या वर्षी भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवला. यावेळी विरोधकांना आपल्या जागा वाचवण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. मात्र भाजपने भरपूर जागा जिंकून विरोधकांना चांगलेच नाकी नऊ आणले. मात्र, २०२४ च्या लोकसभेत चित्र पलटले. वाढती बेरोजगारी, शेती उत्पन्नाला हमी भाव, अर्थव्यवस्थेची अनिश्चित वाटचाल या प्रश्नांनी केंद्र सरकारला विळखा घातला आणि विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारला चांगलेच घेरले, तर कलम ३७०, रामंदिर आणि काही जन कल्याणकारी योजनांच्या आधारावर भारतीय जनता पक्षाणे लोकसभा निवडणुकीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.