नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी ही चांगली व्यक्ती आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राष्ट्रीय सरचिटणीस डी. राजा यांनी व्यक्त केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची सभा बुधवारी नागपुरातील धंतोली परिसरात झाली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
डी राजा म्हणाले, देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचारानुसार काम करतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची छबी आक्रमक नेते अशी आहे. त्यांच्यामुळे देश सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात पिछाडीवर गेला. भाजपचे काही नेते संविधानापेक्षा गीता हा धार्मिक ग्रंथ श्रेष्ठ मानतात. हे चुकीचे आहे.
हेही वाचा – बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, मविआ नेत्यांकडून भाजप लक्ष्य
दरम्यान नितीन गडकरी आरएसएस विचाराचे असले तरी मोदी, शहांच्या तुलनेत सौम्य आहेत. ते भाकपचे नेते ए. बी. बर्धन यांचा आदर करीत होते. त्यामुळेच देशात पहिल्यांदा भाजप सत्तेवर आल्यावर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते भाकप कार्यालयात ए. बी. बर्धन यांच्या भेटीला आले होते. अशी आठवण राजा यांनी सांगितली. गडकरींनी संसदेत वैद्यकीय विमासह इतरही काही विषयांवर आपली भूमिका मांडली असल्याचेही डी. राजा यांनी सांगितले. मोदी- शहा यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देशाला चुकीच्या वाटेवर नेत आहे. या नेत्यांना देश- विदेशात फिरायला वेळ आहे. परंतु देशातील मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून पेटत असताना तेथे जायला वेळ नसल्याचीही टीका डी. राजा यांनी केली.
दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचे काय?
भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी २ कोटी तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह विविध स्वप्न दाखवत सत्ता मिळवली. परंतु आता या आश्वासनांचे काय झाले? हे पुढे येत आहे. सध्या तरुणांच्या हाती काम नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने ते हवालदील आहे. देशात महिला अत्याचार वाढत असून कामाच्या ठिकाणीही महिला सुरक्षित नाही. देशात सर्वत्र दलीत, आदिवासींवरील गुन्हे वाढत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार पूर्णपने अपयशी असल्याचा आरोपही डी. राजा यांनी केला.
हेही वाचा – पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
एक देश, एक निवडणूक अव्यवहार्य
केंद्रातील भाजप सरकार एक देश, एक निवडणूक करू बघत आहे. प्रत्यक्षात हे अव्यवहार आहे. संविधानाने निवडणूक आयोग स्थापन केले असून त्यांना निष्पक्ष निवडणूक घेण्याचे अधिकार आहे. त्यानुसार निवडणूक आयोग विविध निवडणूक घेत असते. एक देश, एक निवडणुकीमुळे या निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होऊन देश हुकूमशाहीकडे जाण्याचा धोका आहे, असे डी. राजा म्हणाले.