नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात आलेल्या आंदोलनात घर जाळणे, थेट हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या संदर्भातील गुन्हे मागे घेण्यात येणार नाही मात्र, अन्य इतर आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. घर जाळणे किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हे गुन्हे मागे घेण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे सरसकट सर्वच गुन्हे मागे घेण्यात आलेले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ!
मराठा आरक्षण देण्यासंदर्भात कायदेशीर मार्ग काढावा लागेल, असे आम्ही सांगत होतो, मात्र मला आनंद आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने सकारात्मकता दाखविली आहे. नोंदी नसलेल्या रक्त नात्यातील लोकांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि सरकारने हा मार्ग स्वीकारला आहे. यामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार आहे. ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. छगन भुजबळांची नाराजी असेल तर जी कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली आहे, त्यामुळे भुजबळ यांचे समाधान होईल.
हेही वाचा – ‘परीक्षा पे चर्चा’ गुरुजींसाठी ठरतेय डोकेदुखी
मराठा समाजाला आरक्षण दिले असले तरी या निर्णयाचा ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि तो होऊ देणार नाही. क्युरेटिव्ह पिटीशन आणि सर्वेक्षण या दोन्ही बाबी सुरू आहेत. मराठा मोठा समाज आहे, त्यामुळे सर्वेक्षण सुरू असून आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. क्युरेटिव्हमधून न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर मागच्या वेळेला न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दूर करण्याचे प्रयत्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.