नागपूर : करोनाच्या कठीण काळात नागपुरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशनने (व्हीएचए) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बुटीबोरीत ३ एकर भूखंड घेत येथे प्राणवायू निर्मिती प्रकल्प प्रस्तावित केला. आता प्राणवायूला मागणी नाही. त्यामुळे ही जागा परत केली जाणार आहे.
विदर्भात करोना काळात प्राणवायूची मागणी दुपटीहून जास्त वाढली. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हीएचएला बुटीबोरी एमआयडीसीत हा प्रकल्प उभारण्याची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत व्हीएचएच्या विनंतीवरून बुटीबोरीत ३ एकर जागा आरक्षित करण्यात आली. परंतु आता करोना काळाच्या तुलनेत १० टक्केही प्राणवायूची मागणी नाही. दुसरीकडे करोनानंतर बहुतांश मोठ्या रुग्णालयांनी स्वत:च प्राणवायू निर्मिती प्रकल्प रुग्णालयात उभारले. परिणामी, व्हीएचएकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह इतरही संबंधित मंत्रालय व अधिकाऱ्यांना ही जागा परत घेण्याची व भूखंडासाठी भरलेले पैसे परत करण्याची विनंती करण्यात आली. या पत्रामुळे आता हा प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकल्पासाठी जमा केलेले पैसे व्हीएचएला परत मिळणार काय, याकडे लक्ष लागले आहे. या विषयावर व्हीएचएकडून नुकतेच डॉ. श्रीकांत मुकेवार, डॉ. अनुप मरार आणि डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी गडकरींची भेट घेत निवेदन दिले होते.
हेही वाचा – नागपूर : मेट्रो स्थानकावरील रात्रीच्या खेळाचे गुढ कायम, अज्ञाताचा तासभर धुमाकूळ?
हेही वाचा – हिंदी विद्यापीठ : जाहीर सत्याग्रह करण्याचे घोषित करीत विद्यार्थी आक्रमक
“शहरातील बऱ्याच रुग्णालयांनी स्वत:चे प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. प्राणवायूची मागणीही खूपच खाली आली आहे. त्यामुळे बुटीबोरीत हा प्रकल्प उभारणे व त्याच्या देखभाल- दुरुस्तीवरचा खर्च करणे कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ही जागा परत घेण्याची विनंती आम्ही संबंधित संस्थेला केली आहे.” – डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशन.