चंद्रपूर: करोना नवीन व्हेरिएंट जेएन १ ला घाबरण्याची गरज नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताने जगात सर्वाधिक लसीकरण केले. जागतिक आरोग्य संघटनेने याची दाखल घेतली आहे. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एम्ससोबत टेलिकन्सलटन्सीच्या माध्यमातून जोडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मांडवा, खडसांगी, पाटण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तथा तीन उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार आहे. एक आधुनिक प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
शासकीय विश्राम गृहावर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत डॉ. पवार यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना योग्य वागणूक न देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आढावा घेतला.
हेही वाचा – वीज बिल नेमके कमी कसे करावे? जाणून घ्या हा पर्याय…
भारताने कोविडमध्ये उत्तम काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडमध्ये प्रत्येक राज्याला पेकेज दिले होते. एनएचएमचे बजेट वाढवून देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी रुग्णांसाठी ६४ हजार कोटींचे पॅकेज ५ वर्षांसाठी दिले आहे. चंद्रपूर येथे १ कोटी रुपयांची नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवावा असेही निर्देश आरोग्य विभागाला दिले. आतापर्यंत जिल्ह्याला २३ कोटींचा निधी दिला आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजनेत जिल्ह्यात १७ लाख लाभार्थी आहेत. प्रत्येकाचा ५ लाखांचा विमा आहे, अशीही माहिती दिली.
हेही वाचा – नागपुरात करोनाग्रस्त वाढले, ६ जण रुग्णालयात, किती सक्रिय रुग्ण पहा..
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २१ डिसेंबर खनिज विकास निधीची आढावा बैठक घेऊन काही काम पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्याचा निर्णय घेतला तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांना निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री त्यानंतर सात दिवसांतच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या याचा विशेष आनंद आहे. आढावा घेऊन शक्य ती सर्व मदत करण्याचा निर्णय आरोग्य मंत्री डॉ. पवार यांनी घेतला आहे. आरोग्याच्या बाबतीत उत्तम जिल्हा व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. बल्लारपूर येथे १०० खाटांचे कामगार हॉस्पिटल सुरू करणार आहे. त्यासाठी पाच एकर जागा बघितली आहे. मूल येथे १४० कोटींचे १०० खाटांचे हॉस्पिटल, आय ऑन व्हिल हे डोळ्यांचे हॉस्पिटल फिल्म इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून निर्माण केले जाणार आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.