नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. गेल्या दोनच दिवसांपूर्वी चक्क कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या मनोज घाडगे आणि भूषण शाहूसाखळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले तर यशोधरानगर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण करून त्याचा हातच मोडून टाकला. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस आयुक्तांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोपी पोलीस कर्मचारी रोशन जैयस्वाल याला निलंबित केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना झाले तरी काय? असा प्रश्न पडला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात प्रत्येक पोलीस कर्मचारी शिस्तीत राहून नियमांचे पालन करीत होता. चक्क ठाणेदारसुद्धा अवैध धंदेवाल्यांपासून लांब राहत होते. मात्र, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यापासून काही ठाणेदारांनी अवैध धंदेवाल्याकडून हप्ते घेणे सुरु केले. तर पोलीस ठाण्यातील डीबी पथकांंनी कारवाईची भीती दाखवून हप्ता दुप्पट करून अक्षरक्ष: लुटमार सुरु केल्याची चर्चा आहे. अधिकारीच भ्रष्ट मार्गाने पैसे कमविण्याच्या मार्गावर असल्यामुळे पोलीस कर्मचारीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात हद्द सोडून पैशासाठी मनमानी कारवाई करणे सुरु केले आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रोशन जैस्वाल याचा शेजारी राहणाऱ्या खांडेकर नावाच्या युवकासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. रोशन जैयस्वाल हा वर्दीचा धाक दाखवून खांडेकर कुटुंबावर दबाव टाकत होता. गेल्या १४ ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता रोशन हा बीट मार्शल म्हणून कार्यरत होता. त्याने खांडेकर याला अडविले. त्याला खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्याचा हात तोडला आणि रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढला. काही युवकांनी खांडेकर याला यशोधरानगर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी रोशन जैयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे अखेर पोलीस कर्मचारी रोशनवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…

हेही वाचा – IAS Shubham Gupta : आयएएस शुभम गुप्ता यांचा आणखी एक प्रताप; महिलेला बेघर केले, खोट्या गुन्ह्यातही गोवले

माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

पोलीस कर्मचारी रोशन जैयस्वाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराला खूप आटापीटा करावा लागला. या गुन्ह्याची माहिती देण्यास यशोधरानगर पोलीस वारंवार टाळाटाळ करीत होते. सध्या माहिती उपलब्ध नाही किंवा तक्रारदाराचे नाव सांगता येणार नाही, अशी उत्तरे प्रसारमाध्यमांना देण्यात येत होती. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens to nagpur police neighbor was brutally beaten arm broken a crime against police employee adk 83 ssb